नवदुर्गा विसर्जनासाठी मनपाची यंत्रणा सज्ज
३२ मंडळांना परवानगी; ८० कर्मचारी, तीन क्रेन, चार तराफे तैनात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : नवरात्रोत्सवाची सांगता होत असताना नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी बैठक घेऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. यंदा शहरातील ३२ नवदुर्गा मंडळांनी विसर्जनासाठी अधिकृत परवानगी घेतली आहे.
देवीचा विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा, यासाठी महापालिकेकडून विसर्जनस्थळी ८० कर्मचारी, तीन क्रेन आणि चार तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये नियुक्ती करण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
अग्निशमन विभागाचे विशेष पथक तैनात
विसर्जनादरम्यान दुर्घटना घडल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी अग्निशमन व आपत्कालीन विभाग सतर्क राहणार आहे. विसर्जनस्थळी एक मोठे अग्निशमन वाहन आणि एक गुरखा वाहन तैनात करण्यात येईल. पाण्यात बचावकार्य करण्यासाठी तीन बोटी आणि पाच कुशल जलतरणपटू उपलब्ध असतील. याशिवाय दहा कर्मचाऱ्यांचे विशेष पथकही तैनात राहणार आहे.
चौकट
रुग्णवाहिका आणि प्रकाशव्यवस्थेवर भर
विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या दवाखाना विभागातर्फे रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावरील पथदिव्यांची दोन दिवस आधी तपासणी करण्याचे निर्देश विद्युत विभागाला देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त फ्लड लाइट्सची व्यवस्थाही केली जाणार आहे. विसर्जनाच्या वेळी भाविकांना अडचणी येऊ नयेत आणि संभाव्य दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.