(सुधारीत वार्तापत्र)
लोगो- चित्र दुष्काळाचे
नवापूर तालुका
पाणीबचतीसाठी प्रभावी उपाययोजनांची गरज
शासनाकडून शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत देण्याची अपेक्षा
विनायक सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
नवापूर, ता. ३ : तालुका शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. तालुक्यातील पीक परिस्थिती काही दिवसांपूर्वी चांगली होती. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. तालुका दुष्काळाच्या छायेत आला आहे. तालुक्यात पंधरवड्यात पावसाने दांडी मारली. त्यामुळे दुष्काळाचे गडद सावट पसरले आहे. या वर्षी पर्जन्यमान नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत चांगले असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास सहा टक्क्यांनी कमी आहे. या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
.........
तालुक्यातील धरणे, लघुबंधारे भरली आहेत. जमीन सुपीक असल्याने पिके तग धरून आहेत. मात्र, पंधरवड्यात पावसाने पाठ फिरवल्याने तालुका भीषण दुष्काळात ढकलला गेला. शेतकऱ्यांची फारच वाईट परिस्थिती आहे. सावकाराचे, पतपेढीचे, बँकांचे कर्ज कसे फेडायचे, कुटुंब कसे चालवायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यायला हवी, तरच शेतकरी जगणार आहे. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान एक हजार ६५० मिमी असताना यंदा २४ सप्टेंबरअखेर केवळ ९८० ते १०५० मिमी पाऊस झाला. नवापूर, खांडबारा, विसरवाडी, चिंचपाडा मंडळात ही तूट ४५ टक्क्यांहून अधिक आहे. श्रावण-भाद्रपद कोरडेच जात आहे. भविष्यात चारा छावण्या लावाव्या तरच पशुधन सांभाळता येईल.
पावसाने साथ न दिल्याने रब्बीही धोक्यात आहे. तालुक्यात गहू, हरभरा, वाटाणा, भाजीपाला यांचे रब्बी क्षेत्र मोठे आहे. जमिनीत ओलावा असला तरी आवश्यक पाऊस पडला नाही तर रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडतील. पिण्याच्या पाण्याची समस्या तालुक्यात गंभीर होऊ शकते. नवापूर शहरासह विसरवाडी, खांडबारा, चिंचपाडा भागातील अनेक पाड्यांवर जलजीवन मिशनची कामे निधीअभावी अपूर्ण आहेत. पाइपलाइन टाकली, पण नळाला पाणी नाही, अशी स्थिती आहे. चाराटंचाईमुळे दूध संकलन ३० टक्क्यांनी घटले आहे. शेतीमजुरांना काम नाही. त्यामुळे गुजरातकडे स्थलांतर वाढले आहे.
...............
शासनाकडून अपेक्षित उपाययोजना
- शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने, अचूक व पारदर्शक पंचनामे करावेत
- पंचनाम्यात कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० ते ७५ हजार रुपये थेट आर्थिक मदत द्यावी
- खरीप हंगामातील पिक नुकसानीची पीकविमा भरपाई त्वरित वितरित करावी
- शेतकऱ्यांची कर्जवसुली तात्काळ थांबवून व्याजमाफी जाहीर करावी
- पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील राखीव जलसाठा सुरक्षित ठेवावा
- तालुक्याचा टंचाई कृती आराखडा तातडीने तयार करून अंमलबजावणी करावी
- पाणीपुरवठ्याचे गावनिहाय पारदर्शक नियोजन जाहीर करावे
- अपूर्ण जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत
- जलजीवन मिशनसाठी शासनाने प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करावे
- पिण्याच्या पाण्याची काटकसर करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी
- रोजगार हमी योजनेतून तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करावीत
- आदिवासी मजुरांचे गुजरातकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक रोजगार द्यावा
- रेशन धान्य दुकानातून दुष्काळग्रस्त कुटुंबांना अतिरिक्त धान्य द्यावे
- दुष्काळग्रस्त कुटुंबातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फी व इतर सवलती द्याव्यात
- रंगावली खोऱ्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत
- शेततळे, गावतलाव दुरुस्ती व गाळ काढण्याची मोहीम राबवावी
- वनराई बंधारे व सिमेंट नाला बांध यावर विशेष भर द्यावा
- भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी अडवण्याचे नियोजन करावे
- लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून दुष्काळ निवारण समिती सक्रिय करावी
-------------------
पावसाचे प्रमाण
सरासरी पर्जन्य : १६५० मिमी.
२४ सप्टेंबरपर्यंत : ७४३ मिमी
गेल्या वर्षी : ७२ टक्के
यंदा : ६६.६ टक्के
जून ते ऑगस्ट : ६७.८ टक्के
सप्टेंबर : ११३.७ टक्के
..........
पीक क्षेत्र
- खरीप क्षेत्र : ७२००० हेक्टर
- बाधित (अंदाजे) : ३५००० हेक्टर
- प्रमुख पीक भात क्षेत्र : ३८००० हेक्टर
- प्रकल्पातील उपयुक्त साठा : ९५ टक्के
..................................
चौकट
पिकांची स्थिती
- ७२ हजार हेक्टर खरिपापैकी ३५ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात
- रायपूर पट्ट्यातील ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला बागायतदार अडचणीत
- विहिरींची पातळी २० ते २५ फुटांनी खालावली आहे.
- उन्हामुळे कापसाची पातेगळ होत आहे, उसाची वाढ खुंटली आहे.
......................
कोट
तालुक्यात पिकांसाठी वेळोवेळी पाणी आवश्यक आहे. पिके गर्भधारणेच्या स्थितीत आहेत आणि पावसाने पाठ फिरवली आहे. आता त्यांना पावसाची गरज आहे. सुरुवातीला पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली असली तरी गेल्या आठवड्यात पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज होती. उत्पादनाची टक्केवारी कमी आहे.
- रमेश ठाकूर गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य, भामरमाळ
...........
तालुक्यातील काळीभोर जमीन असल्याने पाणी धरून ठेवले होते. त्यामुळे सद्यःस्थितीत पीक परिस्थिती चांगली होती. मात्र, पंधरा दिवसांत पाऊस झाला नाही. त्यामुळे पिके आता मान टाकत आहेत. जमीन हलकी, निचरा असणारी आहे, त्या शेतात पिके हातातून गेल्यात जमा आहेत.
- मंजुळाबाई गावित, शेतकरी, करंजी खुर्द
..............