फोटो : NSK26H32145
नंदुरबार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जवाहर नवोदय विद्यालय माजी संघटना पदाधिकारी व पालक.
---
नवोदय विद्यालय दुर्घटनेची चौकशी करा
माजी विद्यार्थी संघटना, पालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १३ : अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, आदी मागण्या नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने व पालकांनी केल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील ग्रामीण व वंचित घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना सुरक्षित व पोषक वातावरण मिळावे, यावर संघटनेने विशेष भर दिला. शाळेत घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी. विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक स्थैर्य जपण्यासाठी उपाययोजना कराव्यात. विद्यालयातील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्रुटी दूर कराव्यात. प्रशासन, पालक व माजी विद्यार्थ्यांमध्ये समन्वय वाढवावा. विद्यालय प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्यात नियमित संवाद व सहकार्य असावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून, माजी विद्यार्थी संघटनेने यापूर्वी स्वतःच्या निधीतून विद्यालयातील बहुउद्देशीय सभागृहाचा पुनर्विकास केला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी यापुढेही प्रशासनाच्या सहकार्य राहील असे आश्वासन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य यांचा संयुक्त संवाद मेळावा आयोजित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पाटील, नागसेन पेंढारकर, ज्ञानेश्वर कोळी, अनिल नाईक, आशुतोष वडाळकर, डॉ. कमलाकर चौरे, डॉ. राहुल वसावे, डॉ. सुनील वळवी, डॉ. संदीप गावित यांच्यासह पालक उपस्थित होते.