ॲंकर
NSK26H31442
जळगाव : नवरात्रोत्सवासाठी घागरा पाहताना तरुणी.
---
गरबा-दांडियासाठी आकर्षक पेहरावांना पसंती
नवरात्रोत्सवानिमित्त बाजारात रेलचेल; पारंपरिक वेशभूषेची तरुणाईला भुरळ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः गरबा-दांडियासाठी लागणारे आकर्षक पारंपरिक पेहराव, रंगीबेरंगी चनिया चोळी, कुर्ते, जॅकेट, दागिने आणि विविध सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. तरुणाईमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येत असून, गरबा-दांडियाच्या तयारीला वेग आला आहे.
नवरात्रोत्सवात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करण्याची परंपरा अनेकांकडून जपली जाते. त्यामुळे महिलांसाठी घागरा-चोळी, चनिया चोळी, ऑक्सिडाइज्ड दागिने, कंबरपट्टा, बांगड्या, कानातले यांना मागणी आहे. तरुणांसाठी केडियू, कुर्ता, धोती, रंगीबेरंगी जॅकेट आणि पारंपरिक फेटे उपलब्ध झाले आहेत. यंदा पारंपरिक वेशभूषेसोबत आधुनिक फॅशनचा मिलाफ असलेल्या पोशाखांकडे तरुणाईचा कल दिसत आहे. विविध रंगसंगती, आकर्षक नक्षीकाम, मिरर वर्क आणि भरतकाम असलेल्या कपड्यांनी दुकानांमध्ये लक्ष वेधले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सायंकाळच्या वेळेत विशेष गर्दी होत असून, व्यापाऱ्यांनाही खरेदीच्या वाढत्या उत्साहामुळे दिलासा मिळत आहे.
चौकट/ग्राफ
नवरात्रोत्सवासाठी कपड्यांचे दर (अंदाजे किंमत)
चनिया चोळी ८०० ते ३,५००
डिझायनर घागरा-चोळी १,५०० ते ५,०००
गरबा कुर्ता ५०० ते १,८००
केडियू (पुरुषांसाठी) ७०० ते २,५००
पारंपरिक जॅकेट ५०० ते १,५००
दांडिया काठ्या (जोडी) १०० ते ४००
रंगीबेरंगी बांगड्या ५० ते ३००
पारंपरिक फेटा १५० ते ५००