नवरात्र चिंतन - ५
--------------
स्कंदमाता : दुर्गादेवीचे एक रूप
नवरात्रातील आज पाचवा दिवस. आजपासून पंचरात्रोत्सवाला प्रारंभ होतो. या दिवसाला पंचमी आणि ललिता पंचमी म्हणूनही ओळखले जाते. आज दुर्गादेवीचे स्कंदमाता हे रूप पूजले जाते.
- लक्ष्मीकांत म. जोशी, नाशिक
भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र कुमार कार्तिकेय हे देवासुर संग्रामात देवतांचे सेनापती झाले होते. त्यांना भगवान स्कंद म्हणूनही ओळखले जाते. स्कंदाची माता असल्यामुळे दुर्गादेवीच्या या रूपाला स्कंदमाता असे नाव प्राप्त झाले. स्कंदमाता चतुर्भुज आहे. तिच्या दोन हातांत कमलपुष्पे असून, एका हाताने ती बालस्कंदाला मांडीवर घेऊन सांभाळते. तिचा एक हात भक्तांना आशीर्वाद देणारा आहे. ती सिंहावर आरूढ असते. तिचा वर्ण शुभ्र असून, अनेकदा ती कमळाच्या आसनावर विराजमान झालेली दाखवली जाते. त्यामुळे तिला पद्मासना असेही म्हणतात. योगसाधनेच्या दृष्टीने या दिवशी साधकाचे मन विशुद्धचक्राला स्पर्श करते, असे मानले जाते. त्यामुळे बाह्य क्रिया आणि चित्तवृत्तींचा प्रभाव हळूहळू कमी होऊन साधक लौकिक, सांसारिक आणि मायिक बंधनांतून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करतो. स्कंदमातेच्या उपासनेतून साधकाला परमशांती आणि सुखाचा अनुभव प्राप्त होतो, तसेच मोक्षमार्ग सुलभ होतो, अशी श्रद्धा आहे.
स्कंदमातेची उपासना करताना बालरूपातील भगवान स्कंदाचीही उपासना घडते. स्कंदमाता ही सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवता असल्याचे वर्णन आढळते. ती अलौकिक तेजाने संपन्न असून, आपल्या भक्तांनाही तेजस्वी आणि कांतिमान बनवते, अशी धारणा आहे. श्री स्कंदमातेला वंदन करताना म्हणूया,
सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥