वर्गणी मागणाऱ्या तरुणावर
चाकूने हल्ला; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : आगामी नवरात्रोत्सवासाठी वर्गणी जमा करत असताना जुन्या वादाच्या आणि संशयाच्या कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना प्रजापत नगरात घडली. या हल्ल्यात जखमी तरुणाच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कांचननगर येथील रहिवासी आणि गॅरेज मेकॅनिक प्रतीक भावलाल उमराळे (वय ३०) हे रविवारी (ता. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास प्रजापत नगर (सात खोल्यांजवळ) येथे देवीची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. प्रजापत नगरातील सोपान महाजन यांच्या घरासमोर पोहोचले असता, कांचन नगर (प्रशांत चौक) येथील रहिवासी संशयित गणेश उर्फ काळ्या रवींद्र सोनवणे आणि अजय कोल्हे यांनी प्रतीक यांना अडवले. ‘तू आकाशच्या नातेवाईकांना वकिलांकडे का घेऊन जातोस, असे बोलून संशयितांनी वाद घातला. त्यानंतर दोघांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान अजय कोल्हे याने प्रतीकला धरून ठेवले, तर गणेश उर्फ काळ्या याने कंबरेतून चाकू काढून प्रतीकच्या डाव्या मांडीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच गोळ्या घालून ठार करेल अशी धमकी दिली.
चौकट
जखमी रुग्णालयात
या घटनेनंतर जखमी प्रतीक उमराळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस नाईक प्रदीप राजपूत तपास करीत आहेत.