पहिल्याच दिवशी हजारों भाविक जगदंबेच्या चरणी लिन! कोटमगावला समीर भुजबळ,रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना,हजारांवर भाविक बसले घटी

पहिल्याच दिवशी हजारों भाविक जगदंबेच्या चरणी लिन! कोटमगावला समीर भुजबळ,रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना,हजारांवर भाविक बसले घटी
Published on: 
पान-१ मेन फोटो- 27112 कोटमगाव : येथे नवरात्रोत्सवानिमित्त जगदंबा मातेच्या मंदिरात रविवारी आरती करताना समीर भुजबळ व शेफाली भुजबळ. शेजारी रमेशगिरी महाराज व पदाधिकारी. कोटमगावला मंगलमय वातावरणात नवरात्रोत्सवास सुरुवात पहिल्याच दिवशी हजारो भाविक जगदंबेच्या चरणी लीन; हजारांवर भाविक बसले घटी सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ११ : जगदंबा मातेच्या भूतलावरील ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटमगाव येथील जगदंबामाता मंदिरात रविवारी (ता. ११) कोपरगाव बेट येथील रमेशगिरी महाराज तसेच माजी खासदार समीर भुजबळ, डॉ. शेफाली भुजबळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी हजारो भाविक जगदंबा मातेच्या चरणी लीन झाले. ................ रविवारी पहाटेपासूनच येवला-कोटमगाव रस्ता गर्दीने फुलून गेला होता. येथील जगदंबा मातेची प्रसन्न तेजस्वी स्वयंभू तीन फुट उंचीची शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती हे तीनही रूप एकाच ठिकाणी पाहावयास मिळत असल्याने येथे विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आज पहिल्याच दिवशी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव व नगर जिल्ह्यासह इतरत्रचे भाविक मंदिराच्या आवारातील ग्रामपंचायत, ट्रस्ट तसेच मंदिर, सामाजिक सभागृहात भाविक घटी बसले आहेत. सकाळी मंदिर आवारात घटस्थापना करण्यात आली. समीर भुजबळ व रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते महाआरती झाली. जगदंबा देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जगदंबामातेच्या चरणी नतमस्तक होत समीर भुजबळ यांनी राज्याला दुष्काळाच्या छायेतून बाहेर काढून बळीराजाला संकटातून सावरण्याचे बळ द्या आणि जनतेला सुख, समृद्धी व समाधान लाभू द्या, अशी प्रार्थना केली. त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. उत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि आवश्यक सुविधांबाबत त्यांनी माहिती घेतली. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी आवश्यक सूचना दिल्या. जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे, दीपक लोणारी, गोटू मांजरे, दीपक गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, गणेश गवळी, भूषण लाघवे, आदित्य कानडे, सुमित थोरात, सचिन सोनवणे आदी उपस्थित होते. .................. चौकट अशी आहे यात्रा - परिसरात ४० सीसीटीव्हीचा वॉच - २२.५ तास मंदिर खुले राहणार - मंदिर परिसरात स्वयंसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, तर स्वच्छतेसाठी महिला स्वयंसेवक तैनात - ३०० पेक्षा अधिक हॉटेल, खेळणी व इतर दुकाने थाटली - पाच हजारांहून अधिक भाविकांची नवसपूर्ती - रोज पहाटे येवल्यातून दोन हजारांवर भाविक पायी दर्शनाला - घटी बसणाऱ्यांसाठी रोज धार्मिक कार्यक्रम - २० वर पोलिसांचा बंदोबस्त तैनात - रोज सकाळी आठ, तर रात्री नऊला महाआरती - कुणाल दराडे फाउंडेशन तसेच येवला डॉक्टर असोसिएशनतर्फे भाविकांसाठी तपासणी ......................................................................................................... फोटो : 08792, 08793 घाटनदेवी ः घटस्थापना करून रविवारी नवरात्रोत्सवाचा प्रारंभ करताना नगराध्यक्षा शालिनी खातळे. शेजारी संजय खातळे, शक्तिकुमार उपाध्याय, भारत साळी आदी. दुसऱ्या छायाचित्रात कावनई येथील सजवलेली कामाक्षीमातेची मूर्ती. घाटनदेवी येथे घटस्थापना नगराध्यक्षांच्या हस्ते महापूजा इगतपुरी ः शैलपुत्री घाटनदेवी मातेच्या मंदिरात रविवारी घटस्थापना होऊन पारंपरिक पद्धतीनुसार नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. नवरात्रोत्सवाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शन घेतले. घटस्थापनेसाठी शहरासह पंचक्रोशीतील विविध भागांतील भाविकांनी शिस्तीचे दर्शन घडवत घट बसवले. दरम्यान, तालुक्याच्या विविध भागातून दाखल झालेल्या भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. मंदिरात नगराध्यक्षा शालिनी खातळे यांच्या हस्ते महापूजा झाली. संजय खातळे, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, शक्तीकुमार उपाध्याय, नीलेश देवराज, नगरसेवक किरण फलटणकर, ट्रस्टचे भारत साळी, ताराचंद भरिंडवाल, ओमप्रकाश तिवारी, राजेश गुप्ता, शांताराम रिखे, रामगोविंद यादव, भूषण चांदवडकर आदी उपस्थित होते. घाटनदेवीच्या पायथ्याशी व कसारा घाटाच्या आरंभापूर्वी असणाऱ्या उंटदरीचे निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी दाखल झालेल्या भाविकांनी उंटदरी व परिसरात गर्दी केली होती. आज सकाळपासूनच मंदिर परिसरासह महामार्ग फुलला होता. महामार्गावर महामार्ग पोलिस व इगतपुरी पोलीसांच्या नियोजनानुसार सर्व्हिस रोड निर्माण करण्यात येऊन वाहतूक वळविण्यात आली. पोलिस निरीक्षक घनशाम बळप, सारिका आहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात आहे. ................ चौकट कावनईतही उत्साह सिंहस्थाचे मूळस्थान तसेच तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या कावनई येथील कामाक्षीमाता मंदिरातही नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून, मंदिरात रोज विविध कार्यक्रम होणार असल्यचे नवरात्रोत्सव व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुलदीप चौधरी यांनी सांगितले. .......... ................................................................................................................. फोटो-10241 पिंपळगाव बसवंत-ः जगदंबा मातेला चढविण्यात आलेला चांदीचा मुकुट आणि नवरात्रोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांनी काढलेली मिरवणूक. पिंपळगाव बसवंतमध्ये ‘उदे गं अंबे’चा जयघोष पिंपळगाव बसवंत ः ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने पिंपळगाव बसवंतला जगदंबामातेच्या नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. घटस्थापनेनिमित्त भाविकांनी मंदिरांत गर्दी केली होती. सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका, आकर्षक चित्ररथ, कावडी आणि डोक्यावर कलश घेऊन सहभागी झालेल्या महिलांमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. निफाड फाट्यावर मिरवणुका पोहोचताच उत्साहाला उधाण आले. ग्रामदैवत असलेल्या वणी चौफुलीवरील जगदंबामाता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मूर्तीला चांदीचा मुकुट चढविण्यात आला. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली. चिंचखेड रस्त्यावरील संतोषी मातामंदिर तसेच दगूनाना नगरमधील तुळजाभवानीमाता मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, भास्करराव बनकर, ‘मविप्र’चे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, बाजार समितीचे संचालक दिलीप मोरे, राजेश पाटील, नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, गटनेते गणेश बनकर, नीलेश पाटील आदी सहभागी झाले होते. यंदा शहरात गरबा-दांडियाचे व्यापक आयोजन करण्यात आले असून, चिंचखेड रस्त्यावर संतोषीमाता मित्रमंडळ, ग्रीन जिम मित्रमंडळ, मित्र फाउंडेशन आणि जगदंब प्रतिष्ठान, तर उंबरखेड रस्त्यावर जाणता राजा मित्रमंडळ तसेच दगूनाना नगरमध्ये सहारा मित्रमंडळातर्फे गरबा-दांडियासह विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असून, नऊ दिवस शहरात भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळणार आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com