फोटो - 16060
येसगाव : झेंडूंनी बहरलेले शेत.
-----
नवरात्रोत्सवात झेंडूला मागणी वाढण्याची शक्यता
दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादन घटणार; भाव वाढण्याची शेतकऱ्यांना आशा
सकाळ वृत्तसेवा
येसगाव, ता. ८ : ग्रामीण भागात यंदा पावसाअभावी अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना जेमतेम पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी हायब्रीड झेंडूची लागवड केली आहे. काही ठिकाणी ठिबक सिंचनवर झेंडू लावलेली दिसतात. कसमादे पट्ट्यात काही भागात ठिकठिकाणी झेंडूची लागवड दिसून येते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूना मोठी मागणी राहण्याची शक्यता असल्याने या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नवरात्रोत्सवात घटस्थापना, देवीची पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी व दसरा सणासाठी, झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे या काळात झेंडूला बाजारपेठेत चांगली मागणी मिळते. यंदा अनेक भागांत पाण्याची कमतरता असल्याने झेंडूचे क्षेत्र तुलनेने कमी राहिले आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त राहिल्यास झेंडूच्या भावात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या झेंडूच्या पिकाला सध्या चांगली वाढ झाली असून, नवरात्रोत्सवाच्या काळात उत्पादन बाजारात येणार आहे. त्यामुळे यंदाचा झेंडूचा बाजार शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. बाजारपेठेत शंभर ते दीडशे रुपये किलोचा भाव असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.