आदिमायेच्या चरणी आजपासून नवरात्रोत्सवाचा जागर

आदिमायेच्या चरणी आजपासून नवरात्रोत्सवाचा जागर
Published on: 
आदिमायेच्या चरणी आजपासून नवरात्रोत्सवाचा जागर सप्तशृंगगडावर घटस्थापना; दर्शनासाठी भाविकांची लगबग सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १० : महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या त्रिगुणात्मक स्वरूपातील श्री सप्तशृंगी निवासिनी आदिमायेच्या गडावर रविवार (ता. ११)पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. घटस्थापना, पंचामृत महापूजा आणि सुवर्णालंकारांनी देवीला सजविण्याच्या धार्मिक विधींनी उत्सवाची सुरुवात होईल. दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली असून, उत्सवाच्या नियोजनासाठी प्रशासन, देवी ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. १०) विविध गावांतील देवीच्या पालख्या गडावर दाखल झाल्या. अखंड ज्योत घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू असून, ‘उदो गं आई उदो’च्या जयघोषाने गड परिसर भक्तिमय झाला आहे. रविवारी सकाळी सहाला श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कार्यालयात देवीच्या अलंकारांचे पूजन होईल. त्यानंतर ढोलांच्या गजरात अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी सातला मंदिर प्रक्षालन पूजा, मूर्तीचे पाद्यपूजन आणि पंचामृत महापूजा होणार आहे. मुख्य धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या हस्ते, तर न्यासाचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांच्या उपस्थितीत हे विधी पार पडतील. पंचामृत महापूजेनंतर देवीला नऊ महावस्त्रे आणि सुवर्णालंकारांनी सजवून महाआरती करण्यात येईल. सकाळी साडेनऊला घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला विधिवत प्रारंभ होईल. उत्सवकाळात रोज सकाळी सातला पंचामृत महापूजा होणार असून, सप्तमी ते महानवमीदरम्यान विशेष धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्बंध नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्योत घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांमुळे नांदुरी ते सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी प्रशासनाने ८ ऑक्टोबरपासून खासगी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले आहेत. दोन वर्षांत वाढलेल्या वाहनसंख्येमुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आधारकार्डाद्वारे ओळख पडताळून त्यांच्या वाहनांना प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या माळेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी अपेक्षित असून, पुढील नऊ दिवस गडावर देवीच्या पूजाअर्चा आणि धार्मिक परंपरांचा जागर रंगणार आहे. VNI26B13170 सप्तशृंग गड : पहिली पायरी प्रवेशद्वारावर भाविकांची झालेली गर्दी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com