esakal | नाशिकसाठी हवा आणखी २० टन लिक्विड ऑक्सिजन; भुजबळांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

नाशिकसाठी हवा आणखी २० टन लिक्विड ऑक्सिजन; भुजबळांना साकडे

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : माजी आमदार जयवंत जाधव यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधील परिस्थितीसंदर्भात पत्र लिहिले असून, नाशिकसाठी आणखी २० टन लिक्विड ऑक्सिजन दिवसाला उपलब्ध व्हावा, अशी विनंती केली आहे. तसेच आयएमए, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्यात ऑनलाइन दैनंदिन संवाद होऊन खासगी रुग्णालयांच्या प्रश्‍नांची तड लावावी, असे साकडेही त्यांनी या पत्राद्वारे पालकमंत्र्यांना घातले.

पालकमंत्र्यांना जयवंत जाधवांचे साकडे

सरकारी यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी रुग्णालयांमधील दैनंदिन समन्वयाच्या अभावावर जाधव यांनी या पत्राद्वारे बोट ठेवले आहे. उपाय म्हणून आयएमएच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांच्या दैनंदिन अडचणींचे संकलन करून ते यंत्रणांच्या दैनंदिन संवादात मांडल्यास प्रश्‍न सुटण्यास मदत होईल, असा आशावाद श्री. जाधव यांचा आहे. कोरोनाग्रस्तांची आणि ऑक्सिजन उत्पादकांकडून सतत लिक्विड ऑक्सिजनच्या होणाऱ्या मागणीकडे यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

खड्डे बुजविण्याऐवजी हवी ठोस कार्यवाही

रेमडेसिव्हिर नाही, ऑक्सिजन कमी पडतोय, व्हेंटिलेटर पाहिजे अशा मागणीचा रेटा वाढल्यावर एकाकडून दुसऱ्याला अशी खड्डे बुजविण्याची कार्यपद्धती सरकारी यंत्रणांकडून अमलात आणली जात आहे. त्यातून नाशिक शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात येत नाही. त्यामुळे आता सरकारी यंत्रणांकडून ठोस कार्यवाहीची अपेक्षा असल्याचे श्री. जाधव यांचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, आयएमएच्या दैनंदिन संवादात रेमडेसिव्हिरपासून ते ऑक्सिजन आणि अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेतील अडचणी मांडल्या जाव्यात आणि मार्ग काढला जावा, असेही श्री. जाधव यांना वाटते आहे.