esakal | प्रश्न 54 टन ऑक्सिजन, 5 हजार रेमडेसिव्हिरचा!
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

प्रश्न 54 टन ऑक्सिजन, 5 हजार रेमडेसिव्हिरचा!

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : मेडिकल विक्रेत्यांकडून जिल्हा यंत्रणेकडे रेमडेसिव्हिरचे वितरण हस्तांतरित झाल्याने नागरिकांची उन्हातान्हातील वणवण थांबली असली, तरी रेमडेसिव्हिरचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. २४ दिवसांत एकही इंजेक्शन जिल्ह्याला मिळालेले नाही. तब्बल ५४ टन ऑक्सिजन आणायचा कुठून? ही जिल्ह्याची विवंचना आहे. परिणामी शनिवार (ता.१७)पासून सामान्याप्रमाणे आता यंत्रणेला कंपन्यांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.

तब्बल ५४ टन ऑक्सिजन आणायचा कुठून?

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याचा विषय अजून संपलेला नाही. ऑक्सिजन बेडबाबत शहरातील चित्र वेगळे नाही. मात्र कडक लॉकडाउनमुळे संपर्क साधून विनंती आणि याचना करण्यापलीकडे काहीही नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची घुमसट कायम आहे. आठवडाभर आधीपर्यंत कोरोनाबाधितांच्या रुग्णांची आगतिकता मेडिकल दुकानासमोर, रस्त्यावर दिसायची आता प्रशासनाने हे वितरण ताब्यात घेतल्याने हा उद्रेक बंद झाला आहे. वरकरणी सगळे आलबेल आहे. डॉक्टरांनी रुग्णालयामार्फत मागणी करायची असा आदेश असल्याने त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत रुग्णांच्या नातेवाइकांची उद्रेक थांबला असला तरी, रेमडेसिव्हिर उपलब्ध होत नाही. ही स्थिती कायम आहे.

आगतिकता कायम

पण प्रत्यक्षात यात काहीही फरक पडलेला नाही. डॉक्टरांकडून कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रिस्क्रिप्शन सुरू आहे. नातेवाइकांची आगतिकता कायम आहे. फरक एवढाच पडलाय आता मेडिकल दुकानात इंजेक्शन मिळत नसल्याने लोक रस्त्यावर दिसत नाही, त्याऐवजी अधिकारी, नेते, डॉक्टर, पदाधिकारी यांचे उंबरठे झिजवत आहेत, तर प्रशासकीय यंत्रणेला विविध कंपन्या, उत्पादक यांच्या मिन्नतवाऱ्या कराव्या लागत आहेत. नाशिक जिल्ह्याला रोजची साडेचार हजार ते पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे. पण शनिवार (ता.१८) म्हणजे तब्बल २४ तासांपासून एकही इंजेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे रुग्णाच्या जिवाच्या भीतीने नातेवाईक हवालदिल आहे. तर प्रयत्न करूनही इंजेक्शन मिळत नाही. म्हणून अधिकारी गप्प आहेत. एकूणच काय एका इंजेक्शनमुळे सगळेच आगतिक आहे.

हेही वाचा: विवाह मुहूर्त टळले, तर वर्ष वाया जाणार... !

ऑक्सिजनचा प्रश्नही कायम

जे रेमडेसिव्हिरचे तेच ऑक्सिजनचे. आठवडाभरापर्यंत ५० टन अतिरिक्त ऑक्सिजन असलेल्या नाशिकला रुग्णसंख्येत एवढी वाढ सुरू आहे, की सध्या तब्बल ५४ टन ऑक्सिजन कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्याची ऑक्सिजनची मागणी १३९ टन आहे, तर उपलब्धता जेमतेम ८५ टन आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी ५४ टन ऑक्सिजन उभारायचा कसा? हा कळीचा मुद्दा आहे.