esakal | रुग्णालयात ३ पर्याय असूनही दुर्घटना! आरोग्य विभागाच्या अडचणी वाढणार?

बोलून बातमी शोधा

Nashik oxygen leakage Accident
रुग्णालयात ३ पर्याय असूनही दुर्घटना! आरोग्य विभागाच्या अडचणी वाढणार?
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सेंट्रल पाइपलाइन टाकण्यात आली होती. त्या पाइपलाइनला लिक्विड तसेच, दोन ड्युरा सिलिंडरमार्फत पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र असे तीन कनेक्शन असल्याची माहिती समोर येत असून, गळती सुरू झाल्यानंतर लिक्विड ऑक्सिजनचे कनेक्शन बंद करून पर्यायी ड्युरा सिलिंडरमार्फत पुरवठा शक्य असताना तसे का झाले नाही, सिलिंडर जागेवर होते का, असे प्रश्‍न उपस्थित होत असून, वैद्यकीय विभागाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची माहिती समोर

बुधवारी (ता. २०) ऑक्सिजन गळती होऊन व्हेंटिलेटरवरील २४ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. शासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडून ऑक्सिजन पुरवठादार कंपनीने तंत्रज्ञ न पुरविण्यापासून ते यंत्रणेच्या ऑडिटपर्यंत सर्वच तांत्रिक बाबी तपासून पाहिल्या जात असताना ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी महापालिकेच्या बिटको व डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा भाग म्हणून ऑक्सिजन व्यवस्थेकडे लक्ष देण्यात आले. त्यात डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी तीन पर्यायी व्यवस्था करण्यात आल्या.

अनेक प्रश्न अनुत्तरीत

आयसीयूमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी एक स्वतंत्र सेंट्रल पाइपलाइन टाकण्यात आली. जेथून ऑक्सिजन पुरवठा केला जातो, तेथे सेंट्रल पाइपलाइनला जोडणारे तीन कनेक्शन टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यातील पहिले कनेक्शन लिक्विड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी, तर अन्य दोन ड्युरा सिलिंडरसाठी होते. ड्युरा सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी १९ सिलिंडर खरेदी करण्यात आले होते. ड्युरा सिलिंडरचा पुरवठा पर्यायी व्यवस्था होती. दुर्घटना घडली त्यावेळी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा बंद करून तातडीने रुग्णांना अन्य दोन पर्यायी ड्युरा कनेक्शनमधून ऑक्सिजन पुरवठा करता आला असता. तो का झाला नाही, खरोखर पर्यायी व्यवस्थेसाठी तीन कनेक्शन होते का, ड्युरो सिलिंडरचे कनेक्शन असेल, तर सिलिंडर जागेवर उपलब्ध होते का, जर नसतील तर ते सिलिंडर कुठे गेले, असे प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.