निफाडच्या बहिणीला मालेगावच्या भावाचा आधार! संकटकाळात जपली माणुसकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bandukaka Bachchav

निफाडच्या बहिणीला मालेगावच्या भावाचा आधार! संकटकाळात जपली माणुसकी

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोनाबाधित पती मृत्युशय्येवर, पत्नीला उपचारकाळात जेवण नाही. अशक्तपणा आलेला, झोप नाही, राहायला जागा नाही, डोक्याला, हातापायाला मुंग्या व चक्कर सुरू झाले, हाती दमडी उरली नाही. अंत्यविधी कसा करायचा, घरी कसे जायचे, या विवंचनेत सहारा हॉस्पिटलखाली चिंतामग्न बसलेल्या सरला पुरकर यांना कोणीतरी बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांचा नंबर दिला. दूरध्वनी लागला अन्‌ या बेसहारा बहिणीला आधार मिळाला. तिच्या पतीवर मधुकर पुरकर (रा. पाचोरे वणी, ता. निफाड) यांच्यावर स्वतः अग्निडाग देत बंडूकाका बच्छाव यांनी अंत्यसंस्कार केले. या महिलेला रिक्षात बसवून राम-रहीम कोविड सेंटरमध्ये स्वखर्चाने उपचारदेखील केले. कोरोना संसर्गात ही माणुसकी, सामाजिक सद्‌भाव उल्लेखनीय ठरली आहे.


महामार्गावर पाटीत द्राक्ष विकण्याचा पुरकर कुटुंबीयांचा व्यवसाय. कुटुंबाचा आधार मधुकर पुरकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला. येथील सहारा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. देखभाल करणारी पत्नी सरला आजारी पडली. बच्छाव यांनी अग्निडागाचे सोपस्कार पार पाडल्यानंतर तिला राम-रहीम कोविड सेंटरमध्ये नेले. एचआरसीटी केला. नऊ दिवस सलग उपचार केले. २३ हजारांचे मेडिकल व अन्य उपचाराचा खर्च असे ६० हजार रुपये स्वत: खर्च केले. या दांपत्याची एकुलती मुलगी प्राची पुरकर घरी एकटी होती. तिच्या चिंतेने उपचार सुरू असताना महिला त्रस्त होती. तिला बच्छाव यांच्या पत्नी ज्योती यांनी गावी जाऊन मालेगावी आणले व महिलेच्या स्वाधीन केले. मुलीला पाहताच महिलेच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली. नऊ दिवस या दोघांना बच्छाव यांनी घरून डबा दिला. महिलेला जीवदान देत भावाचे कर्तव्य पार पाडले. या काळात कोणीही नातेवाईक विचारणा करण्यास आले नाही. अखेर पूर्ण बरी झाल्यानंतर या महिलेला साडी-चोळी देत तिला सुखरूप घरी पोचविले. संकटकाळात धावून आलेला हा भाऊ माझ्यासाठी देवच ठरला, अशी भावना सरला पुरकर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावलीकोरोनाबाधितांच्या सेवेला घेतले वाहून
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एक महिन्यापासून बच्छाव यांनी कोरोनाबाधितांच्या सेवेला वाहून घेतले आहे. मंडळाच्या वैकुंठरथाच्या माध्यमातून अनेकांवर अंत्यसंस्कार केले. सावकारवाडी येथील साळुंके, मनमाड येथील श्रीमती बागूल, लखमापूर येथील ७५ वर्षीय वृद्ध, दिव्यांग महिलेची सेवा केली. आजारातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी तिचे निधन झाले. या सर्वांचे अंत्यसंस्कार बंडूकाका बच्छाव यांनीच केले. या सेवेतूनच ते माणूस जन्माचे सार्थक करतात अशा भावना या मृतांच्या आप्तेष्टांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: नाशिकमध्ये बालरुग्णालयांमध्ये २५ टक्के खाटा राखीव; तिसऱ्या लाटेसाठी सज्जता

Web Title: News About Person Help To A Woman In Grief Ashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top