(बातमी आवश्यक)
वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी
महामंडळाची अंमलबजावणी करा
शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे आज निवेदन देणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : उन्हा-पावसाची तमा न बाळगता वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहोचविणासाठी पहाटेपासून झटणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी मंजूर करण्यात आलेल्या कल्याणकारी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळ व वृत्तपत्र विक्रेता विकास फाउंडेशनतर्फे गुरुवारी (ता. ९) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या १६-१७ वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेते विविध न्याय्य मागण्यांसाठी आणि स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसाठी संघर्ष करीत आहेत. अखेर १० ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मंत्रिमंडळाच्या निर्णयाला बराच कालावधी उलटूनही महामंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.
वृत्तपत्राच्या वितरण व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा असलेल्या या कष्टकरी असंघटित घटकासाठी सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना आणि विविध शासकीय सुविधांची गरज असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. सरकारने महामंडळाच्या स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात येणार आहे. याप्रसंगी
मंडळाचे अध्यक्ष नितीन चौधरी, उपाध्यक्ष विशाल वाणी, संजय चौधरी, सचिव विजय कोतकर, सहसचिव अर्जुन पाटील, रवींद्र जोशी, विलास वाणी यांच्यासह महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गोपाळ चौधरी यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.