निफ्ट प्रवेश परीक्षा अर्जाची १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत
फॅशन डिझाइन क्षेत्रात राष्ट्रीयस्तर संस्थेतून शिक्षणाची संधी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ ः नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधील शैक्षणिक वर्ष २०२७-२८ च्या विविध पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘निफ्ट प्रवेश परीक्षा २०२७’ होणार आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना १६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
पदवी अभ्यासक्रम, बॅचरल ऑफ डिझाइन (बी. डेस.) आणि बॅचरल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमध्ये फॅशन क्षेत्रातील एम. डेस., एम.एफ.एम. आणि एम.एफ.टेक आदी विविध अभ्यासक्रमांना या प्रवेश परीक्षेतून संधी मिळणार आहे.
देशभरातील शंभर शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. जनरल अॅबिलिटी टेस्ट संगणकावर आधारित पद्धतीने, तर क्रिएटिव्ह अॅबिलिटी टेस्ट पेन-आणि-पेपर पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये होणार आहे.
इन्फोः
महत्त्वाच्या तारखा अशा
- नियमित शुल्कासह अर्जाची अंतिम मुदत- १६ नोव्हेंबरपर्यंत
- विलंब शुल्कासह अर्जाची मुदत- २१ नोव्हेंबरपर्यंत
- अर्जात दुरुस्तीची मुदत- २२ ते २५ नोव्हेंबर
- प्रवेशपत्राची उपलब्धता- ४ जानेवारी २०२७
- प्रवेश परीक्षेची संभाव्य तारीख- १० जानेवारी २०२७