निफाडमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद

निफाडमध्ये राज्यातील  नीचांकी तापमानाची नोंद
Published on: 
निफाडमध्ये राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद पारा ११.८ अंशांवर; गोदाकाठ परिसरात हुडहुडी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.९ : दिवाळीचा उत्साह ओसरताच उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण गोदाकाठ परिसरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तापमानाचा पारा थेट ११.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून, चालू हंगामातील राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद येथे झाली आहे. अवघ्या दहा दिवसांत निफाडच्या किमान तापमानात तब्बल आठ अंशांची घट झाल्याने परिसरात हुडहुडी भरली आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान केंद्रात रविवारी (ता. ८) किमान ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अचानक झालेल्या या तापमान घसरणीमुळे रात्री आणि पहाटे थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. नाशिक शहरातही तापमानाचा पारा १४.२ अंशांपर्यंत खाली आला आहे. तर धुळे आणि यवतमाळ येथे १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत थंडीचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे. द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली निफाड हा जिल्ह्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक तालुका असल्याने तापमानातील अचानक घसरणीचा परिणाम द्राक्षबागांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. द्राक्ष मण्यांची फुगवण, वेलींची वाढ आणि पिकांच्या एकूण स्थितीवर थंडीचा परिणाम होण्याची भीती बागायतदारांना सतावत आहे. त्यामुळे हवामानातील बदलांकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील दिवसांत थंडीचा जोर वाढणार? सध्या आकाश निरभ्र असल्याने दिवसभर साचलेली उष्णता रात्री वेगाने बाहेर पडत आहे. परिणामी रात्रीच्या तापमानात घट होऊन पहाटे गारठा अधिक जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात आणखी एक ते दोन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.