NPH26B08863
निफाड ः अभिलेख कक्ष हलविणे सुरु असताना.
-----------
३६-४
निफाडला अभिलेख कक्षाचे स्थलांतर सुरू
-----------
दोन महिन्यांपूर्वीच्या आश्वासनाची अखेर प्रशासनाकडून पूर्तता
-----------
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.१६ ः निफाड तहसील कार्यालयातील जुन्या व मोडकळीस आलेल्या अभिलेख कक्षाच्या स्थलांतरासाठी कारसूळचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी केलेल्या बेमुदत उपोषणाची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. अभिलेख कक्ष नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्याच्या कामाला सोमवारपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनाची प्रशासनाकडून पूर्तता होत असल्याने या आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
---------------
निफाड तहसील कार्यालयातील जुन्या अभिलेख कक्षात तालुक्यातील हजारो शेतकरी व नागरिकांच्या जमिनीशी संबंधित सातबारा, फेरफार, जन्म-मृत्यू नोंदी यांसह अनेक महत्त्वपूर्ण शासकीय दस्तऐवज जतन करण्यात आले आहेत. मात्र, हा अभिलेख कक्ष जुन्या व जीर्ण इमारतीत असल्याने पावसाळ्यात पाणी लागून महत्त्वपूर्ण दस्तऐवजांचे नुकसान होण्याची भीती होती. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांशी संबंधित नोंदींच्या सुरक्षिततेचा हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन देवेंद्र काजळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पुढील दोन महिन्यांच्या आत अभिलेख कक्ष नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या कामासाठी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडून १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहितीही लेखी पत्राद्वारे देण्यात आली होती. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतरही काजळे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे, माजी आमदार अनिल कदम आणि विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनीही तहसील प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. अभिलेख कक्ष स्थलांतराच्या कामासाठी विलास कापसे, संतोष त्र्यंबके, रामदास कानडे आणि अमोल कटारे यांनी विशेष मेहनत घेतली आहे. दरम्यान देवेंद्र काजळे यांनी प्रशासनाचे आभार मानले.
-------------
कोट
सातबारा आणि फेरफार हे केवळ कागद नसून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्कांचे महत्त्वाचे पुरावे आहेत. हे अभिलेख सुरक्षित राहणे ही काळाची गरज आहे. जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रश्न मार्गी लागला याचे समाधान आहे.
- देवेंद्र काजळे, उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ
-------------