पान-३ ॲंकर ( याच्या शेजारीच येवला लोकअदालतीची बातमी लावणे)
---------------
NPH26B08771
निफाड ः येथे महसूल लोकअदालतीत सामोपचाराने वाद मिटविलेल्या नागरिकांचा सत्कार करताना
--------------
३६-५
वाद मिटला, वेळ वाचला अन् खर्चही टळला!
------------
निफाडला महसूल लोक अदालतीत २८ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा ः डॉ. मंगरुळे
-----------
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.६ : महसुली वादासाठी वर्षानुवर्षे कार्यालयांच्या पायऱ्या झिजविण्याऐवजी संवादातून तोडगा काढत नागरिकांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचविण्याचा प्रभावी मार्ग निफाड येथील महसूल लोक अदालतीने दाखवून दिला. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियानात’ वादी-प्रतिवादींमध्ये समुपदेशनातून २८ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला.
-------------
महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने आणि परस्पर संमतीने निकाली काढणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. या अदालतीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडील १८१ प्रकरणे, तहसीलकडील १०४ वहिवाट प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. पक्षकारांशी संवाद साधण्यासाठी चार स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली होती.
---------
उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडील २४, तर तहसील कार्यालयाकडील ४, अशा एकूण २८ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड झाली. संबंधित वादी, प्रतिवादी व विधिज्ञांच्या स्वाक्षऱ्या घेऊन समेटाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. उर्वरित प्रकरणांसाठी पुढील तारखा देण्यात आल्या. अदालतीच्या कामकाजासाठी महसूल सहायक शरद घाटगे, मंडळ अधिकारी जयंत लिलके, उल्हास टर्ले, गोविंद काळे, अश्विनी भोसले तसेच महसूल सहायक ललित खैरे, गणेश कुमावत, नितीन भोई व अंबादास पिठे यांनी काम पाहिले. निफाड बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांच्यासह विधिज्ञांचे सहकार्य लाभले.
----------
कोट
परस्पर संवाद आणि समुपदेशनातून वाद मिटल्यास दोन्ही बाजूंचा वेळ वाचतो आणि अनावश्यक खर्चही टाळता येतो. महसूल लोक अदालत ही नागरिकांना जलद, सुलभ आणि सामोपचाराचा मार्ग उपलब्ध करून देणारे प्रभावी व्यासपीठ आहे.
- डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, निफाड
---------
पक्षकारांनी आपले वाद सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढाकार घेतल्यास महसूल विभागालाही प्रकरणांचा जलद निपटारा करता येतो. लोक अदालतीमुळे नागरिकांना कार्यालयीन आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी वारंवार होणारी धावपळ कमी होण्यास मदत होते.
- विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड
----------------