SHC26B13497
शिरपूर : महिला मेळाव्यात परसबागेसाठी भाजीपाला बियाण्यांचे वितरण करतांना नीता बाविस्कर-पवार.
नीता बाविस्कर-पवार : SHC26B13496
-------
ग्रामीण महिलांच्या पंखांना आर्थिक बळ देणारे नेतृत्व
नीता बाविस्कर- पवार यांच्याकडून महिलांना स्वावलंबनाचे धडे
सचिन पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १४ : ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकतेची ऊर्मी निर्माण होऊन त्या स्वावलंबी व्हाव्यात अशा ध्येयाने झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणून नीता सुरेश बाविस्कर- पवार यांना ओळखले जाते. गेल्या दीड दशकाहून अधिक काळ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून तळागाळातील हजारो महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि स्वाभिमानाची पहाट फुलवण्याचे कार्य त्या अत्यंत निष्ठेने करत आहेत.
वाघाडी (ता. शिरपूर) हे त्यांचे गाव. पदवीधर असलेल्या नीताताईंनी २००८ मध्ये ‘माविम’मध्ये सहयोगिनी म्हणून कामास सुरवात केली. प्रारंभी त्यांनी सात गावांतील ६० बचतगटांमधील ६६० महिलांचे संघटन केले. बचतीची सवय, आर्थिक साक्षरता, नेतृत्वगुण आणि बँक कर्जजोडणी याविषयी ग्रामीण महिलांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१३ मध्ये त्यांच्यावर येथील ‘प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्रा’च्या व्यवस्थापकपदाची धुरा सोपवण्यात आली. आज त्यांच्या कार्यक्षेत्रात ३० गावांमधील ३५० बचत गट कार्यरत असून, तब्बल ३ हजार ८५० महिला या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्यामार्फत दरवर्षी सुमारे १८० महिला बचत गटांना बँक लिंकेजच्या माध्यमातून तब्बल साडेसहा कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या पतपुरवठ्यामुळे ग्रामीण महिलांना स्वतःचे लहानमोठेे उद्योग सुरू करण्यास मोठी मदत झाली आहे.
महिलांच्या हाताला नियमित काम मिळावे, यासाठी नीताताई अन्नप्रक्रिया उद्योग, गृहउद्योग आणि विविध स्थानिक व्यवसायांना चालना देणे, परसबाग आणि सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे, महिलांचे आरोग्य, पोषण आणि वैयक्तिक स्वच्छता याविषयी सातत्यपूर्ण जनजागृती करणे, विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ थेट गरजू महिलांपर्यंत पोहोचवणे अशा कामांत सक्रीय आहेत. त्यांचे दोन्ही मुलगे अभियंता आहेत.
-------
महिलांविषयी असलेल्या आस्थेला ‘माविमं’मुळे बळ मिळाले. वरिष्ठांकडून नेहमीच उत्तेजन आणि मार्गदर्शन लाभते. स्वावलंबी महिलांना पाहून मिळणारे समाधान हीच कामाची पावती मानते.
- नीता बाविस्कर-पवार, वाघाडी