(पान ४ ला मेन)
NYA26B01554
न्याहळोद : परिसरात करपू लागलेले कपाशीचे पीक.
----------
न्याहळोद परिसरात ‘रब्बी’चेही संकट गडद
विहिरींनीही गाठला तळ; शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
न्याहळोद, ता. ८ : पावसाने पाठ फिरवल्याने न्याहळोद व परिसरातील शेतकऱ्यांसमोर यंदा गंभीर संकट निर्माण झाले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली असून, आता रब्बी हंगाम कसा साधायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. पावसाअभावी अनेक विहिरींमधील पाणीसाठाही कमी झाला असून, काही विहिरींनी तळ गाठला आहे.
-------
खरीप पिकांच्या पेरणीपासून बियाणे, खत, निंदणी, कोळपणी, फवारणी आणि मजुरीवर मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळाले नाही. परिणामी, अनेक ठिकाणी पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक खर्च पाण्यात गेला आहे. तसेच, प्रशासनाने न्याहळोद परिसरातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत, दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घ्यावी आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. खरीप हंगामात पावसाने साथ दिली नाही, त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक गेले. आता रब्बी हंगामासाठी विहिरींमध्येही पुरेसे पाणी नाही. ज्यांच्याकडे थोडे पाणी आहे, त्यांनाही फवारणी व शेतीचा खर्च परवडत नाही. शासनाने वेळीच आर्थिक मदत केली. तर रब्बी पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल, अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
विहिरींमध्येही पाणी अपुरे
खरीप हंगामातच पावसाची मोठी तूट राहिल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे विहिरींमध्येही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. काही शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये थोडेफार पाणी उपलब्ध असले तरी त्यावर संपूर्ण रब्बी हंगाम अवलंबून ठेवणे कठीण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरींमध्ये पाणी उपलब्ध आहे, ते रब्बी पिके वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र पाणी देण्याबरोबरच पिकांची फवारणी, औषधे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे.
रब्बी पिकांसाठी मदत द्यावी
खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्याची संधी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातून मिळू शकते. मात्र, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. ज्या विहिरींना पाणी उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसाठी फवारणी, औषधे व आवश्यक शेती खर्चाकरीता शासनाने विशेष आर्थिक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.