
नाशिक : कोरोना काळामध्ये जवळपास दोन वर्षे महापालिकेचे जलतरण तलाव बंद असल्याने वार्षिक देखभाल शुल्क घेतले गेले नाही. परंतु आता जलतरण तलाव नियमित सुरू झाल्याने २८७२ सभासदांकडून जवळपास वीस लाख वार्षिक देखभाल शुल्क वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सभासदांच्या विरोधामुळे महापालिकेची कोंडी झाली आहे. (NMC dilemma over life members opposition to swimming pool Nashik Latest Marathi News)
शहरात नाशिक महापालिकेचे चार जलतरण तलाव आहे. यातील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव येथे १७३५, नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात ५७६, सातपूर जलतरण तलाव ४१२, सिडकोच्या स्वामी विवेकानंद जलतरण तलाव येथे १४९ असे एकूण २८७२ आजीव सभासद आहे. या सभासदांकडून वार्षिक प्रतिसभासद ३५० रुपये देखभाल शुल्क घेतले जाते.
२०२०-२१ व २०२१- २२ या दोन आर्थिक वर्षात कोरोनामुळे जलतरण तलाव बंद करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, आता जलतरण तलाव नियमित सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन वर्षाचे प्रतिव्यक्ती मिळून ७०० रुपये देखभाल शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८७२ सभासदांना प्रत्येकी ७०० याप्रमाणे वीस लाख दहा हजार चारशे रुपये शुल्क माफ करणे शक्य नाही.
त्यामुळे कोविडकाळात जलतरण तलाव बंद असले तरी अजून सभासदांकडून एवढी रक्कम वसूल केली जाणार आहे. परंतु कोविडकाळात जलतरण तलाव बंद असल्याने देखभाल शुल्क अदा करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे महापालिकेने दोन वर्षाचे शुल्क माफ करून चालू आर्थिक वर्षाचे शुल्क भरण्याची तयारी सभासदांनी दाखवली आहे. मात्र, महापालिका एवढ्या मोठ्या रकमेवर पाणी सोडण्यास तयार नसल्याने पेच निर्माण झाला आहे.