दूषित पाण्यासंदर्भात हयगय करणार नाही
---
दत्तनगर प्रकरणी पालकमंत्री महाजन यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : अंबड परिसरातील दत्तनगरमधील रसायनयुक्त पाण्याच्या प्रश्नी आतापर्यंत ५० हून अधिक कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रश्नावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची डोळेझाक झाली. सदर प्रकरणी कोणाचीही हयगय केली जाणार नाही, अशा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. मात्र, या दूषित पाण्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याच्या चर्चेत तथ्य नाही, असेही महाजन यांनी सांगितले.
दत्तनगरमधील रसायनयुक्त पाण्याच्या पुरवठ्यासंदर्भात पालकमंत्री महाजन यांनी शुक्रवारी (ता. १६) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या वेळी महसूल, महापालिका, एमआयडीसी, एमपीसीबी, निमा आणि आयमासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री महाजन म्हणाले, की दत्तनगर भागातील रसायनमिश्रीत पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना त्वचेचे आजार जडले आहेत. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध यंत्रणांमार्फत परिसरातील उद्योगांची तपासणी मोहीम राबविली. त्यात प्रशासनाने आतापर्यंत ५० हून अधिक कंपन्या ‘सील’ ठोकले. या कंपन्यांमधील विषारी व दूषित पाणी जमिनीत सोडले जात असल्याने आजूबाजूच्या विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी पूर्णपणे दूषित झाले होते. त्यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. दूषित व रसायनयुक्त पाणीपुरवठ्यासंदर्भात एमआयडीसी, एमपीसीबी, आरोग्य विभाग आणि विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. त्या वेळी अवैध कंपन्या आणि वाढत्या प्रदूषणावरून संबंधितांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. मात्र, सदर पाण्याने कर्करोगासारखे आजार होत असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिली, असा दावाही महाजन यांनी केला. तसेच, या पाण्याने कातडी जळणे, हाताला आणि शरीरावर फोड येण्यासारखे गंभीर त्वचाविकार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---चौकट
दोषींवर कारवाई : महाजन
दत्तनगरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री महाजन यांनी दिला. तसेच, परिसरातील कूपनलिका ‘सील’ करण्यात आल्या असून, हे ‘सील’ तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अतिरिक्त पाइपलाइन जोडण्यात आल्या आहेत. टँकरची सोय केल्याची माहिती महाजन यांनी दिली.