लोगो : प्रेरणादायी (टुडे ४, ॲन्कर)
-------
वर्धापन दिनाचा खर्च टाळून १० विद्यार्थी दत्तक
उपशीर्षक
नोबेल फाउंडेशनचा उपक्रम; शैक्षणिक खर्च उचलणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनानिमित्त होणारे विविध कार्यक्रम आणि जाहिरातींवरील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त परिस्थितीतील दहा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची सुविधा देण्यासोबतच त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे.
नोबेल फाउंडेशनचा अकरावा वर्धापन दिन १५ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. गेल्या अकरा वर्षांपासून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या फाउंडेशनने यंदा उत्सवापेक्षा सामाजिक उत्तरदायित्वाला प्राधान्य देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
वर्धापन दिनानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित करणे किंवा जाहिरातींवर खर्च करण्याऐवजी तोच निधी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा निर्णय नोबेल फाउंडेशनने घेतला आहे. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपुढे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, अशा कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे थांबू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या निर्णयानुसार दहा गरजू विद्यार्थ्यांना निवासी सुविधेसह मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांच्या शिक्षणासाठीही विनामूल्य सहकार्य केले जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
---------
कोट
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही काळाची गरज आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- जयदीप पाटील
--------