
Nashik News: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परीक्षा कामकाजावर बहिष्कार; 20 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा
नाशिक : राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
गुरुवार (ता.२)पासून परीक्षा कामकाजावर बहिष्कारचा निर्णय घेताना राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केली आहे. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात २० फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंदचा इशारा दिला आहे. (Non teaching staff boycott examination work Notice of indefinite strike from February 20 Nashik News)
संपूर्ण महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी नियोजित सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी २० फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा इशाराही कृती समितीने दिला असल्याची माहिती नाशिक जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल माळोदे, महासंघाचे सहसचिव दिलीप बोंदर, माध्यम प्रवक्ता दिलीप ठाकूर व इतर सर्व सहकारी यांनी दिली आहे.
यासंदर्भात गुरुवारी (ता.२) कॉलेज रोडवरील एचपीटी कला व आरवायके विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राज्यव्यापी आंदोलन नियोजन सभा पार पडली.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
सेवक संयुक्त समितीचे अजय देशमुख, प्रकाश म्हसे पाटील, रावसाहेब त्रिभुवन, संदीप हिवरकर, विजयकुमार घरत, गोंडवाना विद्यापीठाचे अधिसभा सदस्य सुनील चिमूरकर, सचिन सुरवाडे, डॉ. मुरलीधर हेडाऊ उपस्थिती होते.
असे आहेत आंदोलनाचे टप्पे
- २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार
- दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारीला निदर्शने
- तिसऱ्या टप्प्यात १५ फेब्रुवारीला काळ्या फिती लावून कामकाज
- चौथ्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला एकदिवसीय लाक्षणिक संप
- पाचव्या टप्प्यात २० फेब्रुवारीपासून सर्व कृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात कामबंद
- २० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालयात कामबंद