फोटो -NSK26H31624
रिपोर्ट नॉर्मल, तरी त्रास का?
------------------------
‘डॉक्टर, माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत; पण मला अजूनही बरं वाटत नाही.’ डॉक्टरांकडे येणाऱ्या अनेक रुग्णांकडून हे ऐकायला मिळते. डोकेदुखी, छातीत अस्वस्थता, चक्कर, पोटाच्या समस्या, श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, वेदना, हृदयाची धडधड किंवा सततचा थकवा अशी लक्षणे जाणवतात. मात्र, तपासण्या आणि स्कॅन नॉर्मल आल्याने अनेकदा रुग्णाचा त्रासच नाकारला जातो.
- डॉ. किरण शांडिल्य
‘तुम्हाला काहीही झालेले नाही; हे सगळे तुमच्या डोक्यात आहे,’ असे म्हणणे चुकीचे आहे. कारण लक्षणे आणि त्यांचा अनुभव खरा असतो. मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध आहे. ताणतणाव, चिंता, नैराश्य, भावनिक आघात, अपुरी झोप आणि मानसिक थकवा यांचा वेदना, पचन, श्वासोच्छ्वास, स्नायूंचा ताण आणि हृदयाच्या धडधडीवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर हृदयाच्या तपासण्या नॉर्मल आल्या तरी हृदयाबाबतची चिंता कायम राहू शकते. ही चिंता वाढल्यास शारीरिक लक्षणे अधिक तीव्रतेने जाणवू शकतात.
सध्याच्या तपासण्यांमधून लक्षणांचे स्पष्ट शारीरिक कारण सापडलेले नाही, एवढाच त्याचा अर्थ असतो. नवीन किंवा सतत राहणारी लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. योग्य वैद्यकीय तपासणीसोबत गरज असल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणेही उपयुक्त ठरू शकते. याचा अर्थ ‘वेडेपणा’ असा अजिबात नाही. कुटुंबीयांनी ‘नाटक करू नकोस’ म्हणण्याऐवजी, ‘तुला त्रास होत आहे, आपण योग्य मदत घेऊया,’ अशी भूमिका घ्यावी. रिपोर्ट नॉर्मल असले तरी त्रास खरा असू शकतो; योग्य समज आणि उपचार महत्त्वाचे आहेत.