ॲंकर
जूनपासून शाळांना पोषणशक्ती अनुदानाची प्रतीक्षा
दिवाळीपूर्वी पोषण आहाराचे थकीत अनुदानाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. २१ : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील अनुदान जून महिन्यापासून रखडल्याने शाळा प्रशासनासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वयंपाकी मानधन, इंधन आणि पूरक आहारासाठी मिळणारा निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने योजनेची अंमलबजावणी करताना शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी थकीत अनुदान शाळांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शालेय शिक्षण विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसह एकूण ८५ हजार २०६ पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
केंद्र शासनाच्या निकषांनुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोजच्या भोजनातून ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने मिळणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचा आहार न देता त्यात विविधता आणण्यासाठी पुलाव, खिचडी, उसळ, वरण-भात यांसह १२ प्रकारच्या पाककृती निश्चित केल्या आहेत. विद्यार्थ्यांना रोज ताजा आणि सकस आहार देण्याची जबाबदारी शाळांवर असते. मात्र, स्वयंपाकी मानधन, इंधन आणि पूरक आहारासाठी आवश्यक असलेला निधी वेळेत मिळत नसल्याने शाळा व्यवस्थापनाला आर्थिक नियोजन करताना अडचणी येत आहेत.
स्वयंपाकी आणि मदतनीस यांना दररोज सरासरी ८० रुपये मानधनही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी संबंधित कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीसांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. विद्यार्थ्यांना नियमितपणे पोषण आहार मिळणे आवश्यक असताना अनुदानाच्या विलंबामुळे शाळा व्यवस्थापनासमोर प्रश्न निर्माण झाले आहेत. सणासुदीच्या काळात स्वयंपाकी व मदतनीसांना थकीत मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शासनाने तातडीने स्वयंपाकी मानधन, इंधन आणि पूरक आहाराचे थकीत अनुदान दिवाळीपूर्वी शाळांच्या खात्यावर जमा करावे. अशी मागणी शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
कोट
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून मानधन थकल्यामुळे घरखर्च भागवताना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आहे. थकीत मानधन तातडीने जमा करावे. तसेच आगामी काळात दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळावे.
-कल्पना माळी, स्वयंपाकी, माजी ग्रामपंचायत सदस्या,