न्याहळोद परिसरात रब्बी पेरणीला वेग
दुष्काळसदृश परिस्थितीतही शेतकऱ्यांची लगबग; कांदा लागवडीची तयारी
सकाळ वृत्तसेवा
न्याहळोद (ता. धुळे), ता. १७ : परिसरात हळूहळू थंडीची चाहूल जाणवू लागल्याने ग्रामीण भागातील शेतीच्या कामांना वेग आला आहे. थंडीची सुरुवात होताच रब्बी हंगामातील हरभरा आणि गहू पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, काही भागांत कांदा लागवडीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असली, तरी ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये अद्याप मुबलक पाणीसाठा आहे, त्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बी हंगामातील पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. मात्र, आता वातावरणात थंडी वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
न्याहळोद शिवारात काही शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने त्यांनी हरभरा आणि गहू पेरणीला प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर कांदा लागवडीसाठी शेतजमीन तयार करणे, रोपांची व्यवस्था करणे, मशागत करणे आणि पाण्याचे नियोजन करण्याची कामे सुरू आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत, पेरणी आणि इतर कामांची धावपळ पाहायला मिळत आहे.
यंदा पावसाने पाठ फिरविल्याने अनेक शेतकऱ्यांना पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागत आहे. विहिरींमध्ये पाणी असलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेण्याची संधी मिळत असली, तरी उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
हरभरा आणि गहू ही रब्बी हंगामातील महत्त्वाची पिके असून, कांदा पिकालाही परिसरात चांगले महत्त्व आहे. योग्य हवामान, पाण्याचे नियोजन आणि बाजारभाव यावर या हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे वाढत्या थंडीमुळे पिकांना पोषक वातावरण मिळेल आणि यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
---
कोट
दुष्काळ परिस्थिती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शासनाने बळीराजाला अर्थसहाय्य मदत करून चाऱ्याची व्यवस्था व रब्बी पेरणीसाठी बिजवायीची व्यवस्था करायला हवी.
- देवीदास जिरे,
माजी उपसरपंच