फोटो ओळी- 03367, 03368
अभोणा : वाढत्या उष्णतेमुळे परिसरातील कांदा व टोमॅटो पिकावर रोगाचा झालेला प्रादुर्भाव.
अभोणा परिसरात पिकांना
‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
सकाळ वृत्तसेवा
अभोणा, ता. ९ : दोन आठवड्यांपासून ‘ऑक्टोबर हिट’च्या वाढत्या तडाख्यामुळे परिसरातील कांद्याची रोपे, मिरची, टोमॅटो, हळद, आद्रक, स्ट्राबेरी, शिमला मिरची व कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. वातावरणातील दिवसरात्रीच्या बदलामुळे रात्री थंडी, पहाटेची दव व दिवसा प्रखर उष्णता याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. गेल्या महिन्यात टाकलेली कांद्याची रोपे, मिरची, टोमॅटो तसेच लागवड झालेल्या कांद्यावर वाढत्या उष्णतेमुळे जळी पडणे, करपा, मर, कूज, फुलगळ आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मिरची, टोमॅटोची उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ होत आहे. तसेच कांद्याची रोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त फवारण्या घ्याव्या लागत असल्याने आर्थिक बजेटही कोलमडले आहे.
.........
कोट
शेतकऱ्यांनी दिवसा पिकांना पाणी न देता, सायंकाळी किंवा सकाळी दिवसाआड पाणी द्यावे. ताक व गूळमिश्रित पाणी उष्णता रोखू शकते. सिलिकॉन किंवा सिव्हिडचा वापर वाढवावा. अतिघातक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक टाळावे.
-विनोद पाटील, कृषी सल्लागार, दह्याणे (पाळे)