‘ऑक्टोबर हिट’चा चटका
पारा ३५ अंशांवर; दिवसा ऊन, रात्री गारवा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ः परतीच्या पावसाने ओढ दिल्यानंतर सप्टेंबरपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. गेल्या सहा दिवसांपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर पोहोचले आहे. सध्याच्या ‘ऑक्टोबर हिट’मुळे दिवसा कडक उन तर रात्री गारवा राहात असताना, किमान-कमाल तापमानात मोठी तफावत निर्माण झाली आहे.
गेल्या सहा दिवसांत शहराचे कमाल तापमान सातत्याने ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे. वाढत्या उकाड्याने आणि तीव्र उन्हाने नाशिककर चांगलेच घामाघूम होत आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून शहरात कोरडे आणि निरभ्र हवामान पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभराच्या तापमानाच्या पाऱ्याचा अंदाज घेतला असता, २ ऑक्टोबरला उच्चांकी ३५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाख्यामुळे जनजीवनावर परिणाम होतो आहे. कमाल तापमानासोबतच हवेतील आद्रतेचे प्रमाण दुपारी ३० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान राहत असल्याने घामाच्या धारा लागून असह्य उकाडा सहन करावा लागत आहे.
----------
रात्री गारवा, दुपारी चटका
शहरात सध्या विषम हवामान अनुभवायला मिळत आहे. पहाटे, रात्रीच्या वेळी किमान तापमान १७ ते २० अंशांपर्यंत घसरल्याने हलका गारवा जाणवतो. तर दुपारी मात्र तीव्र उन्हाचे चटके बसत आहेत. तापमानातील या मोठ्या तफावतीमुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्राकडून केले आहे.
--
गेल्या आठवडाभरात नोंदविलेले तापमान
तारीख कमाल तापमान किमान तापमान
१ ऑक्टोबर ३४.८ २०.५
२ ऑक्टोबर ३५.१ २०.३
३ ऑक्टोबर ३४.५ १७.४
४ ऑक्टोबर ३५.० १७.४
५ ऑक्टोबर ३४.६ १९.५
६ ऑक्टोबर ३४.८ २०.७