Nashik News : जुने कपडे खरेदीचा ‘आनंद’ बाजाराला 30 वर्ष पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

Nashik News : जुने कपडे खरेदीचा ‘आनंद’ बाजाराला 30 वर्ष पूर्ण

मालेगाव : गरिबांना अंग झाकण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून मालेगावचा जुन्या कपड्यांचा बाजार राज्यभर परिचित आहे. सामान्य व गरिबांना कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा ‘आनंद’ वेगळाच असतो.

शहरातील मर्चंट नगरात दर गुरुवारी भरणारा जुन्या कपड्यांचा बाजार हजारो जणांना अल्प किमतीत ‘आनंद’ देऊन जातो. जुने कपडे खरेदीचा हा ‘आनंद’ आता तीस वर्षाचा झाला आहे.

यंत्रमागाचे मॅचेंस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावात रोज लाखो मीटर कापड तयार होते. एवढे कापड तयार होत असले तरी शहरातील दारिद्र्य रेषेखालील गरीब नागरिकांना अंग झाकण्यासाठी जुन्या कपड्यांच्या बाजाराचा आधार घ्यावा लागतो. येथील मर्चंट नगरमध्ये तीस वर्षापासून जुन्या कपड्यांचा बाजार भरत आहे.

येथे झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असून येथील ग्राहकच बाजाराचे केंद्र बिंदू आहे. बाजारात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कपडे विक्रीसाठी येतात. घरातील लागणारे पडदे, उशीला लागणारे कव्हर, बेडशीट, ब्लँकेट कव्हर आदी लागणारे कपडे इतर दुकानांपेक्षा स्वस्त दराने मिळत असल्याने सामान्य व मध्यमवर्गीयांचाही राबता असतो.

बाजारात जुन्या कपड्यांबरोबरच किरकोळ स्वरुपातील खराब झालेले उच्च प्रतीचे कापडही कमी किमतीत मिळते. वाघाडी समाजातील नागरिक जुने कपडे खरेदी करतात. त्या बदल्यात नागरिकांना प्लॅस्टिकच्या टप, बादली आदी वस्तू देतात. संबंधित घाऊक भावाने हे कपडे किरकोळ व्यावसायिकांना विकतात.

व्यावसायिक जुने कपडे धुवून इस्त्री केल्यानंतर गुरुवारच्या बाजारात विक्रीसाठी आणतात. येथील काही व्यावसायिक जुने कपडे मुंबई येथील चोर बाजार, नळ बाजार, भारत बाजार तसेच पुणे येथून देखील जुने कपडे येथे विक्रीसाठी येतात. येथील व्यापारी मुंबई व पुणे येथून जुने कपडे किलोने व नगाप्रमाणे विकत घेतात. बाजारात दोनशे ते अडीचशे दुकाने लावली जातात.

राज्यातील पहिलाच बाजार

मालेगावचा दर गुरुवारी तीस वर्षापासून भरणारा जुन्या कपड्यांचा बाजार हा राज्यातील बहुधा पहिलाच बाजार असेल. जुन्या साड्यांची बाजारात रेलचेल असते. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक बागेला आच्छादन घालण्यासाठी बाजारातून स्वस्तात मिळणाऱ्या साड्या खरेदी करतात. बाजारातील ग्राहक व उलाढाल कायम असल्याने तीन दशकापासून सुरु असलेला बाजार मालेगावचे वेगळे वैशिष्ट ठरला आहे.

''येथे गुरुवारी भरणाऱ्या बाजारातून आठवड्याभराची मजुरी सुटते. नागरिकांना स्वस्तात चांगले कपडे मिळत असल्याने प्रत्येक गुरुवारी ग्राहकांची गर्दी असते. शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिक देखील येतात.'' - शेख खालीक, जुने कपडे विक्रेता, मालेगाव