Nashik News: 'ओम इग्नोराय नम:' - गौर गोपालदास यांचा विद्यार्थ्यांसाठी खास कानमंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gaur Gopaldas

Nashik News: 'ओम इग्नोराय नम:' - गौर गोपालदास यांचा विद्यार्थ्यांसाठी खास कानमंत्र

नाशिक : समस्या नसतील तर तिथे जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. काही समस्या मार्गी लागतात तर काहींवर उपाय नसतो. अशा समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी भावनिक आधार महत्त्वाचा आहे.

समस्या कितीही असुद्या त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष असल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. नाती जपली पाहिजेत, मित्र जपले पाहिजेत असा उपदेश प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास यांनी केला. ते एसएमबीटी फेस्ट २०२३ मध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

या प्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एसएमबीटीचे मुख्य विश्वस्त डॉ सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.३) जगभरात प्रेरणादायी वक्ते म्हणून ज्यांची ख्याती आहे. ते गौर गोपालदास यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

लाईफ’स अमेझिंग सिक्रेट्स असा या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांना आयुष्य आनंदित आणि सकारात्मक जगण्याचा मार्ग अगदी साध्या सोप्या भाषेत गौर गोपालदास यांनी सांगितला. त्यांनी थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन यशस्वी जीवनाचे धडे दिले.

ते म्हणाले, आयुष्यात अशा व्यक्तीचा शोध घ्या, ज्यांच्याकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल. नकारात्मक व्यक्तींपासून चार हात दूर राहा आणि सकारात्मक व्यक्तींना कायम आपल्यासोबत ठेवले पाहिजे. अहंकार म्हणजेच ईगो यामुळे माणूस अनेक गोष्टींना मुकताना दिसतो.

भरपूर पैसा आहे पण घरात सुख नाही. एवढा पैसा कमवून काय करायचे आहे? असे म्हणत फक्त मीच बरोबर ही गोष्ट माणसाला कुठेच घेऊन जात नाही. त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये तुम्ही अहंकार आणू नका.

या गोष्टीमुळे तुमच्या नात्यामध्ये फक्त आणि फक्त दुरावाच निर्माण होईल. जर तुम्हाला नात्यामधील दुरावा कमी करायचा असेल तर तुमच्यामधील मीपणा कमी करा असे म्हणत त्यांनी आनंदी जीवनाचा कानमंत्र म्हणजे ‘ओम इन्गोराय नम:’ असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.

एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट संचलित एसएमबीटी आयएमएस अॅण्ड आरसी मेडिकल कॉलेज, एसएमबीटी आयुर्वेद कॉलेज, एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी, डेन्टल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी कॉलेज ऑफ नर्सिंग, एसएमबीटी हॉस्पिटल यांचा संयुक्त वार्षिकोत्सव एसएमबीटी ट्रस्टच्या धामणगाव, घोटी कॅम्पसमध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गेली दोन वर्षे करोना प्रादुर्भावामुळे हा फेस्ट होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे यंदाच्या फेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

''एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटलची सुरवात अतिशय शून्यापासून झाली. याठिकाणी कुणी फिरतही नव्हते तेव्हा इथे आपण हॉस्पिटल सुरु केले. काही दिवसानंतर याठिकाणी डॉ हर्षल आले; त्यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने आज जो बदल दिसतो आहे तो करण्यात यश मिळवले आहे. आज या हॉस्पिटलची ख्याती सबंध महाराष्ट्रात आहे. अभिमान वाटावा असे कार्य एसएमबीटीच्या माध्यमातून होत आहे.'' - आमदार बाळासाहेब थोरात, माजी महसूल मंत्री