esakal | मुंबईत कांद्याचा भाव क्विंटलला तीन हजारांवर स्थिर
sakal

बोलून बातमी शोधा

onion

मुंबईत कांद्याचा भाव क्विंटलला तीन हजारांवर स्थिर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशांतर्गत कांद्याच्या वाढलेल्या मागणीमुळे मुंबईत बुधवारी (ता. ६) तीन हजार रुपये क्विंटल हा सरासरी भाव कायम राहिला. नाशिकमध्ये सरासरी तीन हजार २०० रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री झाली. मात्र मंगळवारच्या (ता. ५) तुलनेत आज लासलगावमध्ये १००, पिंपळगावमध्ये २६०, देवळ्यात ४५०, तर उमराणेमध्ये ३०० रुपयांनी सरासरी भावात क्विंटलला घसरण झाली.

कांद्याचे भाव ४० ते ४२ रुपयांपर्यंत गेल्याने मागील दोन दिवस बाजारपेठेत निर्यातबंदीच्या शक्यतेने व्यापाऱ्यांमध्ये चलबिचल झाली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली नसल्याने ही चलबिचल आज निवळली होती. मात्र दक्षिणेत सुरु असलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांमध्ये खरेदीचा उत्साह राहिला. दक्षिणेतील पावसामुळे कांद्याचे नुकसान होत आहे.

आज जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा : लासलगाव-तीन हजार ९५०, पिंपळगाव-तीन हजार १०१, देवळा- तीन हजार, उमराणे-दोन हजार ९००. भावात ही घसरण दिसत असली, तरीही देशांतर्गत असलेल्या उन्हाळ कांद्याच्या मागणीमुळे आणखी पंधरा दिवस भावातील मोठी पडझड होण्याची शक्यता निर्यातदारांना वाटत नाही. दरम्यान, लासलगावमध्ये एका दिवसात नवीन लाल कांद्याच्या भावात क्विंटलला दोनशे रुपयांची घसरण झाली. लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याला क्विंटलला सरासरी दोन हजार २०० रुपये असा भाव मिळाला.

पाकचा श्रीलंकेसाठी भाव ३७० डॉलर श्रीलंकेतील सरकारने कांद्यावरील आयात शुल्क वाढविल्याने भारतीय कांदा श्रीलंकेत जाणे जवळपास बंद झाले आहे. अशातच, श्रीलंकेत पाऊस झाल्याने पुढील महिन्यात श्रीलंकेतील व्यापाऱ्यांकडून कांदा मागवला जाण्याची शक्यता भारतीय निर्यातदारांना वाटत आहे. अशातच, पाकिस्तानमधील निर्यातदारांनी श्रीलंकेतील आयातदारांना पाठवलेल्या नवीन कांद्याचा व्हिडिओ श्रीलंकेतून भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचला आहे.

श्रीलंकेतील आयातदारांकडून भारतीय निर्यातदारांकडून स्थानिक बाजारभावाची माहिती घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानमधील नवीन कांद्याचा व्हिडिओ भारतात पोचल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानच्या निर्यातदारांनी श्रीलंकेतील आयातदारांना ३७० डॉलरमध्ये टनभर कांदा पोच देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत पोचली आहे.

loading image
go to top