संक्षिप्त
--------------
ऑनलाइन जुगारात
अडीच लाख गमावले
धुळे : ऑनलाइन जुगारात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून भाजी विक्रेत्या तरुणाची दोन लाख ५० हजार ५५ रुपयांची फसवणूक झाली. सारोळे (जि.पुणे) येथील हेमंत ज्ञानेश्वर वाघमारे हा तरुण सध्या धुळे शहरात नातेवाइकांकडे राहतो. त्याने १९ जुलै ते २५ सप्टेंबरदरम्यान मोबाइलवर विविध ऑनलाइन गेमिंग संकेतस्थळांवर जुगार खेळला. यावेळी ऑनलाइन जुगार चालविणाऱ्यांनी त्याला विविध लिंक पाठवून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार हेमंतने बँक खात्यातून यूपीआय व ऑनलाइन बँकिंगद्वारे संबंधितांच्या खात्यांवर दोन लाख ५० हजार ५५ रुपये वर्ग केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.
-
जुगार अड्ड्यावरील
धाडीत चौघे ताब्यात
धुळे : भाडणे (ता. साक्री) येथील बीएसएनएल टॉवर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर साक्री पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत चौघांना ताब्यात घेऊन रोकडसह पाच दुचाकी, असा एकूण ९४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दहा ऑक्टोबरला रात्री साडेअकराला पत्त्यांवर पैसे लावून जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांसह छापा टाकला. या वेळी काही जण पळून गेले, तर लोहित फिरोज पिंजारी, कपिल वाघ, प्रेम भावसार, रवींद्र ठाकरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजार ३२० रुपयांची रोकड जप्त केली.
-
गोमांससाठा जप्त;
दोन संशयित फरारी
धुळे : साक्री शहरात विनापरवाना गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला. ट्रकमधील लोखंडी कपाट आणि पार्सलच्या आडोशाला १२ गोण्यांत लपविलेले ६०० किलो गोमांस आढळले. मांस आणि वाहन, असा एकूण एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई १३ ऑक्टोबरला पहाटे झाली. ट्रकमधून (एमएच ४६ एफ १२३०) गोमांसाची वाहतूक केली जात असताना पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. चालक आणि त्याच्यासोबतचा एक जण वाहन सोडून पळून गेला. शेतकरी सुरेंद्र भदाणे यांच्या फिर्यादीनुसार साक्री पोलिस ठाण्यात ट्रकचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
महिलेचा विनयभंग
दोघांविरुद्ध गुन्हा
धुळे : तालुक्यातील एका गावात मंगळवारी यात्रोत्सवादरम्यान दारूची विक्री होत असल्याचे एका महिलेच्या निदर्शनास आले. याचा संशय आल्याने शिवदास किसन चव्हाण व भाईदास किसन चव्हाण (दोघे रा. मोरदड तांडा, ता. धुळे) यांनी महिलेस शिवीगाळ, धक्काबुक्की करून विनयभंग करत ठार मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
-
गळफास घेतल्याने
विवाहितेचा मृत्यू
धुळे : बोरीस (ता. धुळे) येथील खासगी कर्मचारी निवासस्थानात पुणी रवी डुडवे (वय २६) या विवाहितेचा गळफास घेतल्याने मृत्यू झाला. बारा ऑक्टोबरला पहाटे साडेपाचपूर्वी ही घटना घडली. पुणी यांचा सुमारे तीन वर्षांपूर्वी रवी डुडवे यांच्याशी विवाह झाला होता. हे दांपत्य गेल्या दीड वर्षापासून कंपनीच्या कर्मचारी निवासस्थानात राहत होते. पुणी यांनी घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी त्यांचे वडील बदा चौहाण यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनगीर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
-