
BDS Exam : ‘बीडीएस’च्या पेपरची ‘ऑनस्क्रीन’ तपासणी
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तंत्रज्ञानाचा अवलंब करत उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्रायोगिक पद्धती यशस्वी ठरली आहे. नुकताच झालेल्या परीक्षांमध्ये दंत शाखेतील बीडीएस अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन’ पद्धतीद्वारे तपासल्या. यामुळे प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण झाल्यावर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.माधुरी कानिटकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आराखडा तयार केले होते. विद्यापीठाचे डिजिटलायझेशन करताना परिसर व संलग्न महाविद्यालयांत आमूलाग्र बदल त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या सुधारणा, संशोधनामुळे परीक्षा संचलनामध्येदेखील नवीन तंत्रज्ञानाचा वापर होण्याच्या अनुषंगाने उत्तरपत्रिकांसाठी ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्यूएशन’ पद्धत राबविण्याचे विचाराधीन होते. त्याअनुषंगाने डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बीडीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय, तृतीय आणि चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे प्रायोगिक तत्वावर या तंत्राच्या माध्यमातून तपासल्या आहेत. कार्यप्रणालीच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, उपकुलसचिव महेंद्र कोठावदे आदींनी परीश्रम घेतले आहेत.
अशी राबविली प्रक्रिया
लेखी परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले. सुमारे चौदा हजार उत्तरपत्रिका ऑनलाइन प्रणालीद्वारे तपासणीसाठी विद्यापीठ संलग्नित २९ दंत महाविद्यालयांमध्ये उपलब्ध केल्या होत्या. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये ‘डिजिटल एव्हॅल्यूएशन’ केंद्राची उभारणी केली. ही ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन ऑफ ॲन्सर बुक’ प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात आली.
जलदगतीने निकालाचा विक्रम
विद्यापीठाच्या इतिहासातील जलदगतीने निकाल जाहीर होण्याचा हा नवीन विक्रम प्रस्थापित केलेला असल्याचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले. ‘ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन’ प्रणालीचे कार्य यशस्वी झाल्याने उन्हाळी-२०२३ जून-जुलै परीक्षेच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी ही पद्घत लागू करण्याचा मानस असून त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.