कापडणेत १ नोव्हेंबरपासून खुल्या
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. २३ : कापडणे क्रिकेट लीग २०२६ (केसीएल) अंतर्गत संघर्ष क्रिकेट क्लबने सलग दुसऱ्या वर्षी खुल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. १ नोव्हेंबरपासून ग्रामीण क्रिकेटचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत ग्रामीण भागातील संघांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघासाठी प्रथम पारितोषिक ३१ हजार व चषक योगेशदादा प्रल्हाद पाटील यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये व चषक राजा पाटील यांच्याकडून, तर तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये व चषक अक्षय शशिकांत भदाणे यांच्याकडून देण्यात येणार आहे. वैयक्तिक कामगिरीसाठी चार षटकार, चार चौकार, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी प्रत्येकी एकवीसशे रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क एक हजार पाचशे आहे.
या स्पर्धेत एका दिवसात दोन सामने खेळवले जातील. एलबीडब्ल्यू वगळता सर्व नियम लागू राहतील. दोन षटकांचे सर्कल राहील. प्रत्येक गोलंदाजाला दोन षटके टाकता येतील. गैरवर्तणूक करणारा संघ बाद करण्यात येईल. प्रत्येक सामना आठ षटकांचा असेल. फक्त खुल्या ग्रामीण भागातील खेळाडूंनाच संधी देण्यात येणार असून, शहरी खेळाडूंना प्रवेश नसेल. स्पर्धेत सहभागासाठी दीपक सोनवणे, अजय मोरे, विजय भामरे व सुहाग सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.