NSK26H35183
जळगाव : ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये आढळलेल्या संशयितांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी.
---
‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये लाखोंचा मुद्देमाल जप्त
---
एकाच रात्री जिल्हाभर पोलिसांची धडक कारवाई; हातभट्टी दारू, जुगाराविरोधात मोहीम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता १६ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंद्यांना आळा घालणे आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिस दलातर्फे सोमवारी (ता. १६) पहाटेपासून संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहीम राबविण्यात आली. अवैध दारू, जुगार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, विनाहेल्मेट वाहन चालविणारे, फरारी संशयित, तडिपार गुन्हेगारांची तपासणी, तसेच समन्स व वॉरंट बजावणी करण्यात आली. भंगार दुकाने, पानटपऱ्या, हॉटेल व लॉजची तपासणी करून सीईआयआर पोर्टलद्वारे चोरीचे मोबाईल शोधण्यात आले.
अवैध गावठी हातभट्टी दारूविरुद्ध १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. ५,७२५ लिटर गावठी दारू आणि २८ हजार १७२ लिटर रसायन जप्त व नष्ट करण्यात आले. या प्रकरणी १२ संशयितांवर कारवाई करत २० लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देशी व विदेशी दारूची अवैध विक्री प्रकरणी १२ गुन्हे दाखल, देशी-विदेशी दारूच्या बाटल्यांचा ६१ हजार ८०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त.
जुगार कारवाई : ८६ गुन्हे दाखल, ६० संशयितांवर कारवाई. १९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
शस्त्र कारवाई : २ तलवारी जप्त. मोटर वाहन कायदा : मद्यप्राशन करून वाहन चालविणारे ७७ जण, विनाहेल्मेट १३३, अनधिकृत पार्किंग ६१ जणांवर कारवाई. एकूण ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांची दंडात्मक वसुली. हरवलेली व्यक्ती शोध : मोहिमेत एकूण १७ जणांचा (महिला-५, पुरुष-७, मुली-५) शोध लावण्यात आला. अंमली पदार्थ (एनडीपीएस) कारवाई : ११ गुन्हे दाखल (ज्यात १० अंमली पदार्थ सेवन केस समाविष्ट आहेत) ३.२५० किलो ग्रॅम गांजा आणि एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त. समन्स व वॉरंट बजावणी : ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावण्यात आले. सराईत गुन्हेगार व तडीपार : ५०७ सराईत गुन्हेगारांची तपासणी करून ११ जणांवर प्रतिबंधक कारवाई, तसेच ८ हद्दपारांवर कारवाई. मोबाईल रिकव्हरी : चोरीस गेलेले किंवा हरवलेले ४२ मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले. एकूण १८० हॉटेल व लॉजेसची तपासणी करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी व त्यांच्या पथकांनी केली.