नाशिक विभागात भोंग्यांचा आवाज मोजण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Order to measure the sound of horns by SIG in Nashik division Nashik News

नाशिक विभागात भोंग्यांचा आवाज मोजण्याचे आदेश

नाशिक : भोंग्यावरुन राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. यातच नाशिक परिक्षेत्रात देखील कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये, यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) यांच्याकडून खबरदारीचे उपाय होती घेण्यात आले आहेत. यात शहराप्रमाणे परिक्षेत्रातही भोंगे वाजविण्यापूर्वी परवानगी आवश्‍यक करण्याच्या सूचनेसह भोंग्याच्या आवाजाची मर्यादा मोजण्याचे आदेश विभागातील सर्व अधीक्षक यांना विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील (B. G. Shekhar Patil) यांनी दिले आहेत.

मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी करीत ३ मे पर्यंत भोंगे न उतरवल्यास मंदिरांवर भोंगे लावून त्यावरून हनुमान चालिसा लावली जाईल, असा इशारा दिला. त्यापार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्त यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व धार्मिक स्थळांवर असलेले भोंगेबाबत परवानगी घेण्याचे आदेश काढले आहेत. ३ मे पर्यंत भोंगे लावण्यास लेखी परवानगी घेण्याचे आदेश दिले असून मशिदींच्या १०० मीटर जवळील परिसरात भोंगे लावण्यास बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितास कारावास, आर्थिक दंडाची शिक्षा किंवा तडीपारी किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा श्री.पांडे (Deepak Pandey) यांनी दिला आहे. भोंग्यांची ध्वनी तीव्रता मोजण्यासाठी देखील पावले उचलली आहेत.

हेही वाचा: राष्ट्रीय जलद, अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा २७ पासून

नाशिक परिक्षेत्रात देखील विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील यांनी खबरदारीचे आदेश दिले आहेत. भोंगे वाजविण्यासाठी परवानगी आवश्यक असेल, ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करू देऊ नका, दोन गटात तेढ निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा तसेच सोशल मिडियावर (Social Media) वादग्रस्त संदेश अपलोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करत ते संदेश तत्काळ मिटविण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यामुळे विशेष शाखांमार्फत प्राप्त गोपनीय अहवालांनुसार पोलिसांची संपूर्ण यंत्रणा खबरदारी बाळगत आहे. वाद उद्भवू नयेत म्हणून शहरासह पाचही जिल्ह्यांत अलर्ट देण्यात आला आहे. या आदेशानुसार नाशिक ग्रामीण भागात सूचनांची अंमलबजावणीस सुरवात करण्यात आली आहे.

हेही वाचा: लग्नाचे आमिष दाखवून अधिकाऱ्याकडून अत्याचार

ग्रामीण पोलिसांकडून अंमलबजावणी

सर्वोच्च न्यायालयाने (SC) दिलेल्या आदेशानुसार परिसरनिहाय आवाजाची क्षमता राखून भोंग्याचा आवाज मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (ता.१९) सय्यदपिंप्री (ता.नाशिक) परिसरातील मशिदीवरील (Mosque) भोंग्याच्या आवाजाची तीव्रता प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोजली. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवासी, वाणिज्य, औद्योगिक व शांतता परिक्षेत्रानुसार दिवसा व रात्रीची आवाजाच्या पातळीची तीव्रता आखून दिली आहे. या पातळीच्या आत आवाज ठेवणे बंधनकारक आहे.

हेही वाचा: शिक्षण विभागात लोकसेवांची हमी

'सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळण्याच्या उद्देशाने व परिक्षेत्रात कुठलाही जातीय तेढ निर्माण होणार नाही या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधीक्षक यांना आवश्‍यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणीस देखील सुरवात झाली आहे."

- डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

Web Title: Order To Measure The Sound Of Horns By Sig In Nashik Division Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..