शहर पान तीनसाठी
---------
सेवा संकल्प अभियानांतर्गत
जळगावात विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे सिंधी कॉलनीतील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी अवयवदान व रक्तदान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या शिबिरात डॉ. रोहिणी मिराशे यांनी अवयवदानाचे प्रकार, ‘ब्रेन डेथ’ म्हणजे काय, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल आठ जणांना जीवनदान कसे मिळू शकते, अवयवदानासंदर्भातील कायदेशीर बाबी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतात अवयवदानाची असलेली गरज स्पष्ट करताना त्यांनी समाजात प्रचलित असलेल्या विविध गैरसमजांचे निरसन केले. अवयवदान केल्यानंतर शरीर विद्रुप होते, धर्मात अवयवदानाला मान्यता नाही किंवा अवयव प्रत्यारोपणाचा लाभ श्रीमंतांनाच प्रथम मिळतो, हे गैरसमज असून, वस्तुस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानाची गरज असलेल्या रुग्णांना मिळणारे जीवनदान व समाजात अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रश्नोत्तरांचे सत्रही यावेळी घेण्यात आले. युवकांमधील अवयवदानासंदर्भातील गैरसमज व भीती दूर करणे, मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी नागरिकांना संकल्प घेण्यास प्रोत्साहित करणे, अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना मदत मिळण्यासाठी सामाजिक सहभाग वाढविणे व युवकांत मानवता, सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांना अवयवदानाची संकल्प प्रतिज्ञा देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली औषधी वैद्यकशास्त्र विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ निवासी डॉक्टर, आंतरवासीयता विद्यार्थी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.