फोटो : H34711
अवयवदानातून पेटविला माणुसकीचा दिवा
माळी कुटुंबीयांच्या निर्णयामुळे अनेक रुग्णांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : ऐन दिवाळीत एका कुटुंबाच्या आयुष्यात दुःखाचा काळोख पसरला. ज्याच्या हातात हात घालून आयुष्याची स्वप्ने रंगवली, तोच जीवनसाथी अचानक काळाच्या पडद्याआड गेला. पण या असह्य दुःखाच्या क्षणीही माणुसकीचा दिवा विझू न देता नांदूरमधमेश्वर येथील माळी कुटुंबाने घेतलेला अवयवदानाचा निर्णय अनेक दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांच्या आयुष्यात नव्या आशेचा प्रकाश घेऊन आला.
नांदूरमधमेश्वर येथील शेतमजूर कुटुंबातील रावसाहेब माळी हा युवक रस्ते अपघातात गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मेंदूमृत झाला. एका क्षणात संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले. पतीला गमावण्याचे दुःख सहन करणाऱ्या पत्नीसमोर आणि आपल्या मुलाला गमावलेल्या आई-वडिलांसमोर आयुष्यातील सर्वांत कठीण प्रसंग उभा होता. मात्र, या दुःखाच्या डोंगराखालीही त्यांनी माणुसकीचा हात सोडला नाही. नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर रावसाहेब यांना पुढील उपचारासाठी आडगाव येथील मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र त्यांचा मेंदूमृत झाल्याचे घोषित केले. या कठीणप्रसंगी अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांनी शासनाच्या झेडटीसीसीच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबीयांचे समुपदेशन केले. कुटुंबीयांनी अवयवदानास संमती दिली.
दिवंगत माळी यांच्या पत्नी म्हणाल्या, की माझ्या आयुष्यात या दिवाळीत अंधार आला आहे. पण माझ्या पतीच्या अवयवांमुळे इतरांच्या आयुष्यात प्रकाश पडणार असेल, तर त्यापेक्षा मोठे समाधान कोणते. माझ्या पतीच्या शरीराची माती किंवा राख करण्यापेक्षा त्याच्या अवयवांमुळे कुणाला तरी नवे जीवन मिळावे, हीच माझी इच्छा आहे. दरम्यान कुटुंबीयांच्या संमतीनंतर शनिवारी (ता. ७) पहाटे साडेचार ते सकाळी दहा वाजेपर्यंत अवघ्या साडेपाच तासांत अत्यंत गुंतागुंतीची अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव संकलनाची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
----------चौकट
मुंबई, पुण्यासह नाशिकच्या
रुग्णांचे प्रत्यारोपण
अवयवदानातून प्राप्त हृदय एअर कॉरिडॉरद्वारे मुंबई येथील एच. एन. रुग्णालयात रवाना केले. यकृत पुण्यात प्रत्यारोपणासाठी पाठविले. एक मूत्रपिंड आडगावच्या मविप्र रुग्णालयात पोच केले. तर दुसरे मूत्रपिंड नाशिकच्याच नाईन पर्ल हॉस्पिटल येथील रुग्णाला प्रदान केले. मविप्र रुग्णालयात नेत्र, तर नेहेते रुग्णालयात त्वचा दान केली.