सप्तशृंगदेवीचे मूळ स्वरुप डामर तंत्रात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saptashrungi Eighteen hand weapons

सप्तशृंगदेवीचे मूळ स्वरुप डामर तंत्रात

नाशिक : श्री सप्तशृंग निवासिनी भगवती मूर्तीच्या संवर्धनाच्या कामात डामर तंत्रानुसार मूळ अष्टादशभुजा आयुधांचे (अठरा हातातील अस्त्र अन शस्त्र) स्वरुप स्वीकारण्यात आले. संवर्धनपूर्वीच्या मूर्तीच्या लेपणाचा मार्ग संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्या उत्तर कालखंडात तत्कालीन समाजाने स्वीकारला. स्मार्त चुडामणी शांतारामशास्त्री भानोसे यांनी पुराण ग्रंथांचा अभ्यास व संशोधनातून ही बाब समोर आणली.

नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी तप केल्यावर भगवतीकडून शाबरी विद्या प्राप्त झाली. त्यासंबंधीचा उल्लेख श भानोसे यांना नवनाथ भक्तीसार ग्रंथातील दुसऱ्या अध्यायामध्ये आढळला. तसेच नामदेव गाथेमध्ये संत ज्ञानोबा माऊलींनी संजीवन समाधीपूर्वी भगवतीची आज्ञा घेतल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच, संवर्धनाच्या कामात श्री सप्तशृंगदेवीचे मूळ आढळलेले अष्टादशभुजा स्वरूप संत ज्ञानोबा माऊलींच्या काळात कायम होते.

ज्ञानोबा माऊलींच्या उत्तर कालखंडात तंत्रविद्येच्या दुरुपयोगातून समाजाला वळवून भक्तीमार्गाकडे आणण्यासाठी आणि तत्कालीन आक्रमणापासून मूळ स्वरूपाचे रक्षण करण्याकरिता भ्रम उत्पन्न करण्यासाठी मूर्तीवर लेपणाचा मार्ग तत्कालीन समाज व्यवस्थेने स्वीकारल्याचा अंदाज आहे. ज्ञानोबा माऊलींच्या उत्तर कालखंडात वैकृतीक रहस्य ग्रंथाप्रमाणे संवर्धनाच्या अगोदरच्या मूर्तीच्या १८ हातांमधील आयुधांचा क्रम ठरवण्यात आल्याचे भानोसे यांच्या अभ्यासातून पुढे आले.

मूळचे अन लेपण ही दोन्ही रूपे पूजनीय

भगवतीची संवर्धनात स्वीकारण्यात आलेले आणि लेपणातील ही दोन्ही रूपे शास्त्रोक्त पद्धतीची असल्याने कायमस्वरूपी पूजनीय आहेत, असे सांगून भानोसे म्हणाले, की मूर्ती संवर्धनाच्या अगोदरचा लेपणासंबंधीचा कालखंड आता संपल्याचे मानावयास हवे. भगवतीचे मूळ रुप स्वीकारण्यात आल्याने यापुढे कुलदैवत म्हणून देव्हाऱ्यातील टाकात बदल करावे लागतील. त्यासाठी टाक निर्मितीसाठीचे साचा बदलावे लागतील. शिवाय भगवतीच्या मंदिरांमधील मूर्तीत आताच्या समाजाला बदल करता येणार आहे. कुलधर्म, कुलाचार, मंगल कार्यामध्ये भगवतीचे नवीन रुप स्वीकारता येईल. मात्र भक्तीभावाने भगवतीचे जुने रुपदेखील भाविक ठेऊ शकतात.

काय आहे तंत्रशास्त्र?

नेरु तंत्र, कात्यायनी, रुद्र यामत तंत्र आदी तंत्र ग्रंथ आहेत. तसे डामर तंत्र हा तंत्र ग्रंथ असून त्यात भगवतीच्या आयुधांचा उल्लेख आहे. शंभू महादेवांनी पार्वती मातेला सांगितलेल्या भगवतीच्या उपासना पद्धतीचा उल्लेख तंत्र ग्रंथांमधून मिळतो. तसे वैकृतीक रहस्य हे तंत्रशास्त्र आहे, अशी माहिती भानोसे यांनी दिली आहे.

श्री सप्तशृंग निवासिनी गडावरील मंदिराचे रचना पाहता सात शिखरांमधील हे स्थान ओंकार स्वरूप आहे. म्हणून हे आद्यपीठ आहे. अपभ्रंश होऊन स्थानाचा उल्लेख अर्धपीठ म्हणून केला जातो. प्रत्यक्षात मात्र हे आद्यशक्तीपीठ आहे. शिवपुराणातील सतीच्या अख्यायिका तसेच देवीभागवत मधील उल्लेखानुसार देशात ५१ शक्तीपीठ आहेत. त्याच्या आधीपासून आदिमाया महिषासुर मर्दिनी स्थित आहे. हा संदर्भ सुद्धा आद्यशक्तीपीठ स्वरुपासाठी महत्त्वाचा ठरतो

- शांतारामशास्त्री भानोसे, स्मार्त चुडामणि, नाशिक

Web Title: Original Form Of Saptashrungi In Damar Tantra Eighteen Hand Weapons Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..