पान-४
OZM26B15017
ओझर ः येथील माधवराव बोरस्ते विद्यालयातील माजी विद्यार्थी मेळाव्यास जमलेले १९९५-९६ च्या दहावीचे विद्यार्थी.
------------------
तीन दशके लोटले तरी मैत्रीचा जिव्हाळा कायम
------------
ओझरच्या बोरस्ते विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, आठवणींना उजाळा
-------
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता.१६ ः येथील माधवराव बोरस्ते विद्यालयातील १९९५-९६ या वर्षातील दहावीच्या चारही तुकड्यांतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील अविस्मरणीय क्षण पुन्हा अनुभवले. तीन दशकांचा काळ लोटला असला, तरी मैत्रीचा जिव्हाळा मात्र तसाच कायम असल्याचे या मेळाव्यातून प्रकर्षाने दिसून आले.
मेळाव्याची सुरुवात राष्ट्रगीत, प्रार्थनेने झाली. उपस्थित शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांप्रति विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शाळेच्या जुन्या वातावरणात पुन्हा एकदा विद्यार्थी म्हणून सहभागी होण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.
प्रत्येकाने आपला परिचय करून देत शालेय जीवनातील आठवणी आणि अनुभव कथन केले. टॅलेंट शो, विविध कलाविष्कार, ओपन माईक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी स्नेहमेळाव्यात विशेष रंगत आणली. अनेक वर्षांनंतर पुन्हा वर्गातील बाकांवर बसून शिकण्याचा आणि दंगा मस्ती करण्याचा अनुभव घेताना बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेच्या सहली, वर्गातील गंमतीजमती, मित्रांसोबतचे किस्से आणि शिक्षकांच्या आठवणींनी वातावरण आनंदमय झाले. येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
विविध खेळ, गप्पागोष्टी, छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींचा प्रवास आणि स्नेहभोजनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले हे माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींनी एकत्र आले होते. निरोपाच्या क्षणी अनेकांचे मन भावुक झाले. भेटवस्तूंची देवाणघेवाण आणि पुन्हा भेटण्याचा निर्धार व्यक्त करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. जुन्या आठवणींचा सुगंध, शिक्षकांविषयीचा आदर, मैत्रीचा अतूट बंध आणि आनंदाचे अविस्मरणीय क्षण यांची सुंदर गुंफण या स्नेहमेळाव्यात पाहायला मिळाली.
---------------