शहरातील पाचकंदील परिसरात अस्वच्छता
मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता.८ : शहरातील महत्वाच्या भाग असलेल्या पाच कंदील, रथ गल्ली, कापसे गल्ली, सराफ बाजार, टिळक रोड व जैन मंदिर परिसरात मुलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. महापालिकेकडून या भागाला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात महापालिका उपायुक्त डॉ. सुनिता कुमावत यांच्याकडे समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
हा परिसर प्रमुख व्यापारी पेठ म्हणून ओळखला जातो. नगरपालिका काळ व मनपा स्थापनेनंतर सुमारे दहा वर्षापूर्वीपर्यंत येथे नियमित स्वच्छता, पथदिवे, डास प्रतिबंधक फवारणी व पाणीपुरवठा आदी सेवा सुरळीत मिळत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक मूळ रहिवाशांचे स्थलांतर झाल्यानंतर महापालिकेचे या परिसराकडे दुर्लक्ष झाले आहे. परिसरात नियमित व दैनंदिन कचरा उचलला जात नाही. त्यामुळे अस्वच्छता पसरुन डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. साथीच्या आजाराचा धोका निर्माण झाल्याने मलेरिया प्रतिबंधक फवारणी करण्याची गरज आहे.
येथील मोकळ्या भुखंडावर रात्री-अपरात्री नशा करणाऱ्या इसमांचा वावर वाढला आहे. त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. लहान मुले व पादचाऱ्यांवर कुत्रे धावून येतात. या भागातील सर्व समस्या सोडविण्यासाठी संबधीत विभागप्रमुखांना तात्काळ आदेश द्यावेत अशी या भागातील मागणी मनोज पाटणकर,राजेंद्र दुसाने, मुकेश दुसाने, विजय पाटणकर, पुनम चौरसकर, सुषमा पाटणकर, योगिता पाटणकर, विद्या पाटणकर, तृप्ती नेरकर, अंकिल देवरे, प्रियंका देवरे, संजय साईनकर, फरीदा अरिफ हुसेन, आसिफ हुसैन, अली अहमद, तुषार पाटील आदींनी केली आहे.