(जागेनुसार कापता येईल) फक्त शहरासाठी)
पाडळसरे धरणासाठी
केंद्रीय मंत्र्यांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील सहा तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निम्न तापी प्रकल्पांतर्गत पाडळसरे धरणाच्या कामाला गती द्यावी तसेच धरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी अमळनेरला भेट द्यावी, असे साकडे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने त्यांना घातले. समितीचे निमंत्रण स्वीकारत लवकरच अमळनेरला भेट देणार असल्याचे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले.
सुरत येथे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पदाधिकारी एन. के. पाटील, नगरसेवक राजू फाफोरेकर, शेतकी संघाचे चेअरमन संभाजी पाटील, छगनभाई पटेल आदी उपस्थित होते. पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश केल्याबद्दल जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांतर्फे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. पाडळसरे धरण हा परिसरातील शेती आणि पाणीप्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, धरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने दुष्काळी परिस्थितीत त्याला गती देण्याची गरज असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यासाठी अमळनेरला भेट द्यावी, असे निमंत्रण त्यांनी दिले.