फोटो : B05088
डीजीपीनगर : रविशंकर मार्गावर पाडवा पहाट मैफिलीत गीत सादर करताना प्रांजली बिरारी-नेवासकर.
---
रविशंकर मार्गावर संगीताची मेजवानी
मान्यवरांच्या उपस्थितीत पाडवा पहाट मैफील
सकाळ वृत्तसेवा
डीजीपीनगर, ता. १३ : गुलाबी थंडीची चाहूल, पहाटेचे प्रसन्न वातावरण आणि संगीताचे सुरेल स्वर अशा त्रिवेणी संगमात रविशंकर मार्गावर ‘भाऊबीज-पाडवा पहाट संगीत मैफल’ उत्साहात पार पडली. संगीत, स्नेह आणि खाद्यसंस्कृतीच्या या महोत्सवाने उपस्थितांचे मन जिंकले.
पूर्व विभागाच्या सभापती मंगला नन्नावरे आणि अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प्रकाश नन्नावरे यांच्यातर्फे मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका प्रांजली बिरारी-नेवासकर आणि सहगायक संदीप थाटसिंगार या मैफिलीचे मुख्य आकर्षण ठरले.
स्थानिक कलावंत निकिता पाटील यांनी सादर केलेल्या गीताला रसिकांची विशेष दाद मिळाली. भक्तिगीत, अभंग आणि भावगीतांच्या या मेजवानीत अमोल पाळेकर, कन्हैया खैरनार, देवानंद पाटील, रोहित कटारे आणि चैतन्य पाळेकर यांच्या वादनाने मैफील अधिकच बहारदार केली. सचिन तिडके यांचे ध्वनी संयोजन, धनेश जोशी यांचे सूत्रसंचालन आणि सहगायिका वैष्णवी अश्विनी यांच्या साथीने कार्यक्रमात रंगत आणली. या वेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, गटनेते श्याम बडोदे, जगन पाटील, नगरसेविका संध्या कुलकर्णी, रूपाली निकुळे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, नगरसेवक चंद्रकांत खोडे, तसेच माजी नगरसेवक यशवंत निकुळे, सुनील खोडे व वैभव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. मैफिलीच्या सांगतेनंतर झणझणीत मिसळ पार्टीचा उपस्थित लोकप्रतिनिधींनी मनमुराद आनंद घेतला आणि राजकीय गप्पा मारत दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. ओबीसी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन नन्नावरे यांनी आभार मानले.