फोटो : H34353
दोन फोटो आहेत
३०-२
पिंपळपारावर १० ला रंगणार
कोमकली यांची स्वरमैफल
संस्कृती वैभवतर्फे पाडवा पहाट ः
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : ‘संस्कृती नाशिक’ आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमात यंदा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांची स्वरमैफल रंगणार आहे. मंगळवारी (ता. १०) पहाटे पाचला नेहरू चौकातील ऐतिहासिक पिंपळपारावर हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दौलतराव घुमरे आणि ॲड. एम. वाय. काळे यांना ‘संस्कृती गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१९९८ मध्ये सुरू झालेला पाडवा पहाट उपक्रम यंदा २८ वर्षे पूर्ण करीत आहे. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांसह अनेक दिग्गज कलाकारांच्या गायनाने या उपक्रमाची सांगीतिक परंपरा समृद्ध झाली आहे.
कलापिनी कोमकली या पं. कुमार गंधर्व आणि वसुंधरा कोमकली यांच्या कन्या व शिष्या आहेत. रागसंगीतातील सखोल चिंतन, माळव्यातील लोकधूनचा प्रभाव आणि संतवाणीचे भावपूर्ण सादरीकरण ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना तबल्यावर अक्षय कुलकर्णी, संवादिनीवर स्वानंद कुलकर्णी आणि पखवाजावर ज्ञानेश्वर आंदिल साथसंगत करणार आहेत.
यंदाचा ‘संस्कृती गौरव’ पुरस्कार शंभरी पूर्ण केलेले ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दौलतराव घुमरे आणि त्यांचे शिष्य ॲड. एम. वाय. काळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य़ ठरणार आहे.