पंचवटी एक्स्प्रेसचा दसरा पूजन सोहळा उत्साहात

पंचवटी एक्स्प्रेसचा दसरा पूजन सोहळा उत्साहात
Published on: 
पंचवटी एक्स्प्रेसचा दसरा पूजन सोहळा उत्साहात अध्यक्ष तांबट यांच्या हस्ते विधिवत पूजन; महिला प्रवाशांच्या गरब्याने नाशिक रोड स्थानकावर रंगत सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता.२० : मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी दररोज हजारो चाकरमान्यांना घेऊन जाणारी आणि त्यांना सुखरूप घरी परत आणणारी नाशिककरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचा दसरा व गाडी पूजन सोहळा नाशिक रोड रेल्वे स्थानकात उत्साहात पार पडला. रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तांबट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रवाशांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक वेशभूषेतील महिला प्रवाशांच्या गरबा नृत्याने स्थानक परिसरात उत्सवी रंगत निर्माण झाली. विजयादशमीनिमित्ताने दरवर्षी पंचवटी एक्स्प्रेसमध्ये या सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाही सकाळपासून नाशिक रोड रेल्वे स्थानकावर तयारी सुरू होती. महिला प्रवाशांनी फलाटावर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या, तर पुरुष प्रवाशांनी स्थानक परिसरासह पंचवटी एक्स्प्रेसची स्वच्छता केली. दररोज प्रवाशांना सुरक्षित प्रवास घडविणाऱ्या या गाडीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवाशांनी एकत्र येत सोहळ्याचे आयोजन केले. फुलांनी सजविण्यात आलेल्या पंचवटी एक्स्प्रेसचे अध्यक्ष तांबट यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. पूजनानंतर पारंपरिक वेशभूषेतील महिला प्रवाशांनी फलाटावर गरब्याचा फेर धरला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्थानक परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे प्रवाशांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारा हा सोहळा दसरा सणाच्या आनंदासोबतच पंचवटी एक्स्प्रेसप्रती असलेली कृतज्ञता आणि प्रवाशांमधील एकोपा अधोरेखित करणारा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com