‘पन्नालाल’च्या सुटकेसाठी ठोठावणार न्यायालयाचे दार
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : कालिका यात्रोत्सवात मनोरंजनाच्या खेळासाठी वापर केल्याच्या कारणावरून गोशाळेत ठेवलेल्या ‘पन्नालाल’ या गाढवाच्या सुटकेसाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या मूळ मालकाने घेतला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत पन्नालालला मुळ मालकांच्या ताब्यात देण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून हस्तक्षेप करावा, असे विनंती करणारे निवेदन देण्यात आले.
शिवसेनेने पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयात दाद मागावी, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले. तसेच या संदर्भातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विधिज्ञांकडून मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, पन्नालालला त्याच्या मूळ मालक जमुनाबाई व किशन भाट यांच्या कुटुंबापासून गेल्या दहा दिवसांपासून दूर ठेवण्यात आले आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून भाट कुटुंबीयांनी त्याचे संगोपन केले. सध्या तो आठ वर्षांचा असून कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मालकांची त्याच्यापासून झालेली ताटातूट असह्य होत आहे. या पार्श्वभूमीवर पन्नालालच्या सुटकेसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, दीपक डोके, गोविंद भाट, उत्तम जाधव, बंटी गांगुर्डे यांच्यासह पन्नालालचे मालक व नातेवाईक उपस्थित होते.