पान दोन
----------------
34547
धुळे : पारधी वस्ती शाळेतील मुख्याध्यापकांचे निलंबन मागे घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांना निवेदन देताना जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती पदाधिकारी.
--
मुख्याध्यापक परदेशी यांचे निलंबन मागे घ्या
प्राथमिक शिक्षक समन्वय समितीची निवेदनातून मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : पारधी वस्ती (ता.धुळे) जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक किशोर धनजी परदेशी यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेऊन त्यांना पूर्ववत सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. ५) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
शाळेतील तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र सदर प्रकरणात संपूर्ण वस्तुस्थिती, त्यांची वैद्यकीय परिस्थिती, त्यांची बाजू तसेच शाळेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी भूमिका संघटनेने मांडली. शाळेत पायाभूत सुविधांचा अभाव असताना केवळ मुख्याध्यापकांना जबाबदार धरणे अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून मुख्याध्यापक परदेशी यांचे निलंबन रद्द करावे आणि पारधी वस्ती शाळेत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी सांगितल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. समितीचे जिल्हाध्यक्ष योगेश धात्रक, कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, श्रीकृष्ण सावळे, किशोर पाटील, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र भामरे, विश्वनाथ सोमवंशी, मिलिंद वसावे, राजेंद्र मदन भामरे, शरद पाटील, सुधीर पाटील, भटू पाटील, रामदास सोनवणे, धिरज परदेशी, अविनाश काकुळदे, भास्कर परदेशी, अतुल पाटील आदी उपस्थित होते.