आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवा
वसंत हंकारे : कळवाडीत व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर,ता.१८: मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडील आयुष्यभर संघर्ष करतात. स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी ते झटत असतात. त्यामुळे आई वडिलांच्या संघर्ष व त्यागाची जाणीव ठेवून व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन सुप्रसिद्ध समाज परिवर्तनाचे व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.
कळवाडी (ता. मालेगाव) येथील सुपर मार्केट मित्र मंडळ व कळवाडीचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाज परिवर्तनाचे व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान झाले.
हंकारे म्हणाले, की आई-वडील आयुष्यभर स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी, प्रगतीसाठी ते झटत असतात. मात्र, मोठे झाल्यानंतर अनेक मुले त्यांच्या त्यागाचा विसर पडू देतात. आई-वडिलांना प्रेम, आदर आणि सन्मान देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यापासून दूर राहण्यासह तरुण मुला-मुलींनी भावनेच्या भरात जीवनाचे महत्त्वाचे निर्णय न घेण्याचे आवाहन केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुपडू देसले, उपाध्यक्ष ललित देसले, खजिनदार दीपक देसले उपस्थित होते. प्रा. संदीप देसले यांनी सूत्रसंचालन केले.