पारोळा रथोत्सवातील चोरीप्रकरणी एकास अटक
बीडमधून ताब्यात; ४७ ग्रॅम सोन्याचे दागिने, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
जळगाव/पारोळा, ता. ३ : पारोळा येथील रथोत्सवात झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून चोरणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून अटक केली. गणेश कचरू पवार (वय ४०, रा. अयोध्यानगर, बहिरवाडी, बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन सोनसाखळी हस्तगत केल्या असून, त्यांची किंमत सहा लाख ११ हजार रुपये आहे.
पारोळ्यात २२ ऑक्टोबरला झालेल्या रथोत्सवात तीन ते चार जणांनी अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून तोडले आणि तेथून पोबारा केला होता. या प्रकरणी २५ ऑक्टोबरला पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्वतंत्र पथक नियुक्त केले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित बीड शहरातील असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्याचे नाव गणेश पवार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथक बीडला रवाना झाले. पारोळा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हितेश चिंचोरे तपास करीत आहेत. ही कारवाई निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संतोष पवार, कर्मचारी हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील आणि चालक रिजवान शेख यांनी केली.
चौकट
आठ दिवसांची शोध मोहीम
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरात सलग आठ दिवस ठाण मांडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला. संशयिताने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर दोन पंच आणि सोनार यांच्या उपस्थितीत त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.